आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये भरवस्तीतील चार दुकाने फोडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-शहरपोलिस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरील तीन तर गोलाणी मार्केटमधील एक अशी एकूण चार दुकाने शनिवारी रात्री तीन चोरट्यांनी फोडली. यात एकूण १२ लाख हजार ५८ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत.

नवीपेठ भागातील सुरेश कलेक्शन येथून ६६ हजार रुपये रोख आणि हजार ३१८ रुपयांचे चांदीचे नाणे तसेच गोलाणी मार्केटमधील जी.व्ही.मोबाइल येथून ११ लाख ३६ हजार ७४० रुपये कमितीचे १०१ मोबाइल चोरीस गेले आहेत. गीता होजिअरी आणि फोम अँडफॅब्रिक्स येथे केवळ चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
झाडावर चढून गाठला चौथा मजला

चोरट्यांनी गीता होजिअरी दुकानाच्या गच्चीवर चढण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा तर सुरेश कलेक्शनच्या गच्चीवर चढण्यासाठी शौचालयाच्या पाइपांचा वापर केला आहे. गीता होजिअरीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. त्यांच्यातील एकाने दुकानातीलच कापड उचलून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर लावल्याचेही त्यात दिसते. इतर दोघे कॅमेऱ्यात चेहरा दिसू नये, म्हणून तोंडापुढे रूमाल धरून होते. तिघांच्या हातात टॉर्च होती. अत्यंत सावधगिरीने त्यांनी दुकानात शोधा-शोध केली. तिघेही चोरटे २० ते २५ वर्षे वयोगटातील असून त्यातील एकाने बनियन घातले होते.
चार सुरक्षारक्षकांचा गराडा, तरीही चोरी
सुरेश कलेक्शनचा एक, नवजीवन कलेक्शनचा एक आणि जनता बँकेचे दोन असे चार सुरक्षारक्षक या परिसरात आहेत. मात्र, दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकांना मागच्या बाजूला सुरू असलेल्या हालचाली कळाल्या नाहीत. तसेच पोलिस ठाणेही हाकेच्या अंतरावर असतानाही चोरट्यांनी चोरी करण्याची मजल गाठली हे विशेष.
सुरेश कलेक्शन : यादुकानात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूने असलेल्या शौचालयाच्या पाइपांचा वापर करून दुसरा मजला गाठला. तेथे थोडी मोकळी जागा गॅलरी होती. या गॅलरीत असलेले लोखंडी गज वाकवून त्यांनी दुकानात प्रवेश केला. अखेर काउंटरमध्ये ठेवलेले ६० हजार रुपये आणि हजार रुपयांच्या चांदीची नाणी घेऊन चोरटे पसार झाले. या वेळी दुकानातील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे चोरट्यांच्या हालचाली कळल्या नाहीत. मुकेश हसवाणी यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
फोम अँडफॅब्रिक्स सुरेशकलेक्शन आणि या दुकानाचे छत कॉमन आहे. सुरेश कलेक्शनच्या छतावर प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी फोम अँडफॅब्रिक्स या दुकानाच्या छतावरील लाकडी दरवाजा तोडला. त्या पाठोपाठ लोखंडी ग्रील, नंतर चॅनल गेट आणि शेवटी परत लोखंडी ग्रील अशी चार दरवाजांची कुलूप तोडून चोरटे दुकानाच्या तिन्ही मजल्यांवर फिरले. कॅश काउंटरवरचे ड्राॅवरही तोडले. मात्र, त्यात पैसे नसल्यामुळे या दुकानामधूनही त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. जसमितसिंग छाबडा यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
गीता होजिअरी : श्यामाप्रसादमुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या गीता होजिअरी या दुकानात चोरट्यांनी रात्री वाजेच्या सुमारास प्रवेश केला. दुकानाच्या मागे असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत ते पोहोचले. या तीन मजली दुकानातील सर्वच बाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती. तिन्ही चोरटे काउंटरपर्यंत पोहोचलेले. काउंटरमध्ये पैसे नसल्यामुळे चोरटे माघारी फिरले. एका कॅमेऱ्यात तिघांचे फुटेज कैद झाले असून पोलिसांनी ते हस्तगत केले आहेत. जितेंद्र हेमनाणी यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
गोलाणीतून मोबाइल चोरी गोलाणीमार्केटच्या २७८ क्रमांकाचे जी.व्ही. मोबाइल या दुकानाच्या शटरचे कुलूप कटरने कापून चोरट्यांनी दुकानातील १०१ मोबाइल चोरून नेले. ११ लाख ३६ हजार ७४० एवढी त्यांची किंमत होती. शनिवारी रात्री १० वाजता दुकानाचे मालक रोहन पाटील यांनी दुकान बंद केले होते. दुकानात सीसीटीव्ही आहेत. मात्र, रात्री ते बंद केलेले होते. रविवारी सकाळी १० वाजता दुकान उघडण्याच्या वेळी कुलूप तुटल्याचे त्यांना दिसून आले.
सुरेश कलेक्शन येथील सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा.