आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवरे बुद्रूकला चोरीच्या दोन घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर- तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे गुरुवारी रात्री चोरीच्या दोन घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी गावातील भवानी मातेच्या मंदिरातून चांदीचा मुकुट, छत्री व दागिन्यांसह एक लाखाचा तर महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून एक लाख 15 हजार, असा एकूण दोन लाख 15 हजारांचा ऐवज लांबवला. पोलिस चौकीच्या जवळच चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

विवरे बुद्रूक गावात बाजार चौकात असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातून 700 ग्रॅम चांदीचे व काही सोन्याचे दागिने लांबवण्यात चोरटे यशस्वी झाले. दुकानात चोरटे शिरल्याची शेजार्‍यांना कल्पना आली. त्यामुळे दुकानात कोण आहे, हे पाहण्यासाठी काहीजण दुकानाच्या समोर आले. यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज गायब असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात चोरी करण्यापूर्वी भवानी मातेच्या मंदिरातून याच टोळीने देवीचा मुकुट लांबवला असावा, असा संशय आहे. दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळताच दुकानमालक निशिकांत वानखेडे यांनी तत्काळ निंभोरा पोलिसांना माहिती कळवली. मात्र, पोलिसांनी तत्काळ हालचाली न केल्याने चोरटे पसार झाले. वानखेडे यांच्या फिर्यादीवरुन निंभोरा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
गावातील सराफा दुकान, मंदिरातून दोन लाख 15 हजारांचा ऐवज लांबवला

पथक स्थापन
या घटनेच्या तपासासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. चोरट्यांनी दुकानाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. या पद्धतीवरून चोरट्यांचा माग काढला जात आहे. घटनास्थळावरून हातांचे ठसे घेण्यात आले. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. साहेबराव चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक, निंभोरा

चोरट्यांनी केला नाश्ता
गावात येण्यापूर्वी चोरट्यांनी स्मशानभूमीजवळ नाश्ता केल्याचे पोलिसांच्या पाहणीत उघड झाले. नाश्त्याचे साहित्य आणि चोरट्यांनी सोबत आणलेल्या टॉर्चचे रिकामे बॉक्स घटनास्थळी आढळले. तसेच चोरी करून परतताना चोरटे पुन्हा याच ठिकाणी एकत्र आले. दुकानातून चोरी करून आणलेल्या दागिन्यांचे रिकामे बॉक्स याठिकाणी टाकून चोरटे पसार झाले. या घटनाक्रमावरून चोरट्यांनी नियोजनपूर्वक हा प्रकार घडवून आणला असावा, असा अंदाज आहे. चोरीच्या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.