आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात चोरट्यांना माजी सैनिकाचा चोप; शांतीनगरमध्ये पहाटे 3.30 वाजेचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तिघा चोरट्यांनी शांतीनगरातील एका घरातून 24 हजार लांबवले. यानंतर दुसर्‍या घरात प्रवेश केला. मात्र, येथे सोने-चांदीऐवजी तिघांपैकी एकाला माजी सैनिकाच्या हातचा मार खावा लागला. यानंतर चोरट्यांनी सैनिकाच्या डोक्यात काठी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. सोमवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली.

नीलेश विलास जोशी (रा. शांतीनगर) गावाला गेल्याने त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातून आणि शेजारी असलेल्या देवघरातील चांदीचे देव, असा 24 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल घेऊन काढता पाय घेतला. त्यांनी शेजारच्या घराकडे मोर्चा वळवला. दाराजवळील खिडकीतून हात टाकत दरवाजा उघडला. मात्र, या वेळी घरात झोपलेले माजी सैनिक नामदेव कौतिक लांडगे यांना जाग आली. घरात चोरट्यांनी प्रवेश केल्याचे लक्षात येताच त्यांनी तिघांपैकी एकाला उचलून थेट खिडकीवर फेकले.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चोरटे गर्भगळीत झाले. अन्य दोन चोरट्यांनी सहकार्‍याला सोडवण्यासाठी माजी सैनिक लांडगे यांच्या डोक्यावर काठीने वार केला. त्यात ते जखमी झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पलायन केले. यानंतरही जखमी लांडगे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या मुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत.

एक संशयित ताब्यात
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पगारे यांनी संदीप सपकाळे (वय 23, रा.अकलूद, ता.यावल) याला संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, माजी सैनिक लांडगे यांनी आरोपींना पाहिले आहे. त्यांच्या माहितीवरून पोलिस आरोपींचे रेखाचित्र तयार करणार आहेत.

25 ते 30 वयोगट
तिन्ही आरोपी 25 ते 30 वयोगटातील असून हिंदी भाषेत बोलत होते. पोलिस निरीक्षक पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नीलेश जोशी यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला. सहायक निरीक्षक राजेंद्र जगताप, हवालदार नसीम तडवी, विजय पाटील तपास करत आहे.