आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Workers Protest Against US Over Devyani Khobragade Issue

काशी एक्स्प्रेसच्या इंजिनावर घोषणाबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - अमेरिकेतील भारतीय उपउच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांना अमेरिका सरकारने अपमानास्पद वागणूक दिली आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे येथील जंक्शन स्थानकावर फलाट क्रमांक सहावर सोमवारी थांबलेल्या काशी एक्स्प्रेसच्या इंजिनावर चढून घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले. दुपारी 2.27 ते 2.35 असे आठ मिनिटे हे आंदोलन झाले. रेल्वेसेवेवर मात्र याचा कोणताही परिणाम झाला नाही. ज्या एक्स्प्रेसच्या इंजिनावर चढून आंदोलन करण्यात आले, ती निर्धारित वेळेवर भुसावळ स्थानकावरून पुढे मार्गस्थ झाली.

दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर रेल्वेस्थानक नाव द्यावे, चैत्यभूमीचे स्मारक निर्माण करा, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोळी, धनगर आणि ठाकूर समाजाला जातीचे प्रमाणपत्र द्यावे, ठेवीदारांच्या रकमा परत करा, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक करा, सच्चर कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही तर 1 जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन व भुसावळ स्थानकावर सलग आठ तास रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी या वेळी आंदोलनात मार्गदर्शन करताना दिला.

यांनी केले धरणे आंदोलन
अमेरिकेतील भारतीय उपउच्चयुक्त देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेने अपमानास्पद वागणूक दिली आहे. या प्रकाराचा निषेध करून अमेरिकेने माफी मागावी या मागणीसाठी सोमवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघदिप नरवाडे, अनुप खोब्रागडे, मनोहर सुरडकर, विनोद सोनवणे, शिवकुमार टेंभुर्णीकर, संजय सुरडकर, नीलेश रायपुरे, निनाजी नरवाडे, दिनेश इखारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनात यांचा प्रमुख सहभाग
राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे, पीआरपीचे युवा जिल्हाध्यक्ष राकेश बग्गन, सुधीर जोहरे, हरीश सुरवाडे, छोटू निकम, राजेश मोरे, राजू मोरे, चाळीसगाव येथील नगरसेवक कालिदास अहिरे यांचा आंदोलनात प्रमुख सहभाग होता. प्रमुख पदाधिकार्‍यांसह तब्बल 350 कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. देवयानी खोब्रागडेप्रकरणी अमेरिकेचा निषेध नोंदवून प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव रेल्वे स्थानकावरही पीआरपीतर्फे 26 डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्थानकावर चोख बंदोबस्त
पीआरपीच्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, जवान, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, बाजारपेठ, शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजय यादव, निरीक्षक के. एस. पुजारी, रेल्वे एलसीबीचे निरीक्षक वासुदेव देसले हे स्थानकावर लक्ष ठेवून होते.

या संघटनांनी केला निषेध
आंदोलनात भारिप बहुजन महासंघ, रिपाइं गवई गट, धम्मदीप चॅरिटेबल ट्रस्ट, तृणमूल कॉँग्रेस, भाजप अनुसूचित जाती मोर्चा, जनहित प्रवासी मंच, बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन समिती, कॉँग्रेस अनुसूचित जाती विभाग, बौद्धजन सेवासंघ, पीआरपी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंरोजगार मागासवर्गीय सेवा सहकारी संस्था, छत्रपती सेवा महाराज सेवा मंडळ, कल्याणी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, शिवराज्य पार्टी, रिपाइं आठवले गट, उषाई फाउंडेशन आदींनी पाठिंबा दिला.