आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅसकटरने एटीएम कापून तब्बल 6 लाख रुपयांची रोकड लंपास; जळगावजवळील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- एचडीएफसी बँकेचे एटीएम पाच दरोडेखोरांनी गॅसकटरच्या साह्याने कापून त्यातील ६ लाख रुपयांची रोकड लंपास केली. रविवारी पहाटे ६ वाजता  जळगाव-भुसावळ महामार्गावरील तरसोद फाट्यावर ही घटना उघडकीस आली. दरोडेखोरांनी एटीएमच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून दोरीने बांधून ठेवले होते.    


तरसोद फाट्यापासून ३० मीटर अंतरावर एचडीएफसी बँकेची शाखा आहे. सुरुवातीला एटीममधून प्रवेश करून मागच्या बाजुला बँकेचे कामकाज चालते. शनिवारी सायंकाळी ५ वाजता बँकेतील कर्मचारी, अधिकारी निघून गेल्यानंतर अविनाश जाधव हा सुरक्षारक्षक एटीमच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर होता. रात्री १० वाजता जाधवची ड्युटी संपल्यानंतर हर्षल सुभाष चौधरी (वय २३, रा.बुनकरवाडा, जुने जळगाव) हा ड्युटीवर आला होता. दरम्यान, मध्यरात्री २.१० वाजता बँकेच्या मागच्या बाजुने असलेल्या शेतातून पाच दरोडेखोर एटीएममध्ये आले. लोखंडी चॅनल गेट उघडे हाेते. त्यांनी काचेचा दरवाजा ढकलून प्रवेश केला. शेजारीच हर्षल खुर्चीवर बसला होता. सेकंदातच त्यांनी हर्षलवर लाेखंडी राॅने हल्ला चढवला. यात हर्षल जखमी झाला. यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय दोरीने बांधून बँकेत एका कोपऱ्यात त्याला झोपवले. अारडाअाेरड केल्यास ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती. यानंतर या पाचही दरोडेखोरांनी गॅसकटरच्या साह्याने एटीएम मशीनच्या खालच्या बाजूस कापण्यास सुरुवात केली. अधूनमधून ते लोखंडी रॉडने ठोकूनदेखील लोखंड तोडत होते. दरोडेखोरांनी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत एटीएम मशीन फोडून त्यातील ६ लाख ३३ हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. 

 

दरोडेखोर  हिंदी भाषिक   
सर्व दरोडेखोर हिंदी भाषेत बोलणारे होते. त्यांनी हर्षलला मारहाण करीत असतानादेखील हिंदीतून शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर ‘शांती से बैठ’, ‘ये बोहोत शातीर दिखता है, इसे कसके बांधो’, ‘गॅसकटर ठीक से जलाओ’, ‘पिछे के बाजुसे हतोडा मारो’ असे संवाद हर्षलने ऐकले होते. त्यांनी आपसात हळू आवाजात बरीच चर्चा केली आहे. परंतु हर्षलपर्यंत त्यांचा आवाज गेला नाही.  दरोडेखोरांनी तरसोदमार्गेच नशिराबाद, भुसावळ असा पळ काढला असावा, असा संशय अाहे.

बातम्या आणखी आहेत...