आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलालमुक्त आरटीओत ओळखपत्राची सक्ती, आदेशानंतर सोमवारी झाले फक्त १० टक्केच काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरटीओ कार्यालयात नागरिकांची कामे घेऊन येऊ नका, अशा स्पष्ट सूचना सोमवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष वारे यांनी आरटीओ कार्यालयातील जिल्हा मोटारचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यापुढे नागरिकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय त्यांचे कोणतेही काम होणार नाही अशा देखील सूचना त्यांनी केल्या. सोमवारी कार्यायात एजंट नसल्यामुळे तसेच ओळखपत्र नसल्याने नागरिकांना माघारी परतावे लागले.

आरटीओ कार्यालयातील कामे अपवाद वगळता सर्वच नागरिकांना एजंटांच्या माध्यमातून करण्याची सवय लागली आहे. तिच स्थिती त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही आहे. त्यातून भ्रष्टाचार बोकाळला आहे. यावर तोडगा म्हणून एजंटांना हद्दपार करून सगळीच कामे नागरिकांनी स्वत: कार्यालयात येऊन करावी, असे आदेश वाहतूक परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहेत. सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आरटीओ कार्यालयात आता कमी मनुष्यबळावर सगळी कामे करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सोमवारी एकूण कामाच्या केवळ १० टक्के काम होऊ शकले. आता पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

मुख्यसचिवांना मनसेचे पत्र
आरटीओतएजंट म्हणून काम करणाऱ्यांना अधिकृत परवाने मिळावे, या मागणीसाठी मनसेतर्फे राज्याच्या परिवहन विभागाच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठवण्यात आले आहे. शेकडो तरुण बेरोजगार असल्यामुळे त्यांना हे काम करण्यासाठी परवाने द्यावेत, ते नागरिकांच्या मदतीसाठीच काम करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मनसेचे जिल्हा सचिव अॅड.जमिल देशपांडे यांनी हे निवेदन पाठवले आहे.

उच्च न्यायालयात जाणार
वारेयांच्या भेटीनंतर एजंट संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी आरटीओ कार्यालयाच्या बाहेरील मोकळ्या जागेत बैठक घेतली. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. १९९२ मधल्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागरिकांचे प्रतिनिधी असल्याचा फाॅर्म भरून एजंटला आरटीओ कार्यालयातील नागरिकांची कामे करता येतील, असे म्हटले आहे. याच मुद्यावर एजंटांनी वारे यांच्यासोबत युक्तिवादही केला. मात्र, काही परिणाम होऊ शकला नाही. अखेर आता न्याय मागण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे एजंटांच्या बैठकीत ठरवण्यात आले.आरटीओ कार्यालयात सोमवारी असा शुकशुकाट होता.

एजंटांकडून कोणतेही काम, कागदपत्रे स्वीकारू नका
सुभाषवारे यांनी सोमवारी सकाळी सर्वप्रथम आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. एजंटकडून कोणतेही काम, कागदपत्रे स्वीकारू नये, नागरिकांनी स्वत: आपली कामे करण्यासाठी आले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे ओळखपत्र तपासूनच त्यांचे काम करा, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानंतर एजंटांच्या संघटनेचे अध्यक्ष वासू सरतन, उपाध्यक्ष रज्जाक खान गनी खान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वारे यांची भेट घेतली. मात्र, शासनाच्या आदेशानुसार यापुढे एजंटकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नसल्याचे वारे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

पहिल्याच दिवशी कार्यालयात शुकशुकाट
सोमवारीकामाची सुरुवात होताच नेहमीप्रमाणे आरटीओ कार्यालयात गर्दी झाली होती. मात्र, एजंटकडून कामे स्वीकारली जात नसल्याचे कळाल्यानंतर अनेकजण माघारी फिरले. त्यामुळे दिवसभर कार्यालयात शुकशुकाट होता. दैनंदिन कामाच्या तुलनेत सोमवारी केवळ १० टक्केच कामे होऊ शकली. सर्व एजंट आरटीओ कार्यालयाच्या परिसरातच एकत्र जमले होते. मात्र, त्यांच्या हातून कोणतेही अर्ज, कागदपत्रे घेतल्यामुळे त्यांनी दिवसभर कार्यालयाच्या परिसरात गप्पा मारून वेळ घालवला.

नागरिकांनी स्वत: कामे करावीत
-शासन निर्णयानुसार एजंटांना बंदी केली आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वत: येऊन ओळखपत्र दाखवून काम करून घ्यायचे आहे. एजंटांकडून आलेली कागदपत्रे यापुढे स्वीकारली जाणार नाहीत. सुभाषवारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी