आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे ग्रामीण आरोग्य विभागाची अब्रू चव्हाट्यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उघडण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांचा कारभार मनमानी पद्धतीने कसा सुरू असतो, याचा प्रत्यय खुद्द जिल्हाप्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांना आला. तालुक्यातील शिरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची त्यांनी अचानक तपासणी केली असता, तेथील कारभार पाहून जिल्हाधिकारी संतप्त झाले. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होऊनही त्यात फारशी सुधारणा झालेली नाही. जनतेच्या आरोग्यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च केले जात असले तरी ती यंत्रणा राबवणारे प्रशासन योग्य नसेल तर त्याचा फायदा जनतेला होऊ शकत नाही. अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची झालेली आहे. अनेक डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास नाखुश असतात. त्यातही नाइलाज झाल्यास ते ग्रामीण भागात न राहता जिल्हा अथवा तालुक्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. केवळ सकाळी एक-दोन हजेरी लावून परत काही कामाचे निमित्त करून ते तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सापडत नाही. काही ठिकाणी तर चक्क नर्स, शिपायामार्फत उपचार आणि औषध देण्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत. त्याबाबत जिल्हा परिषद, नियोजन बैठक अथवा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या आढावा बैठकांमध्ये आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल तक्रारी करूनही कारभारात फारशी सुधारणा झाली नाही. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी, एकाच वेळी दोन्ही वैद्यकीय अधिका-यांनी आरोग्य केंद्र सोडू नये याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना जिल्हाधिका-यांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रकार तालुक्यातील शिरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.
जिल्हाधिकारी महाजन झाले संतप्त - तालुक्यातील शिरूड येथे ई-सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ आणि अन्य अधिकारी गेले होते. कार्यक्रमानंतर जिल्हाधिका-यांनी आपली गाडी शिरूडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे अचानक वळविली. या वेळी केंद्रात कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकारी बाहेर गेल्याचे तर अन्य एक वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणाला गेल्याचे सांगण्यात आले. तसेच स्वीपरही जागेवर नसल्याने जिल्हाधिकारी संतप्त झाले. याप्रसंगी आरोग्य केंद्रात सर्वत्र अस्वच्छता, रुग्णांसाठी कोणत्याही सुविधा नसणे आदी प्रकार आढळून आले.
पल्स पोलिओची बैठक - शासनातर्फे राज्यात राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेबाबत पुणे येथील अधिका-यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांना आमंत्रित करण्यात आले होते. मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रतिनिधी न पाठविता स्वत: वैद्यकीय अधिका-यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. त्यामुळे बहुतेक वैद्यकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. शिरूड आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणासाठी गेल्याने आणि दुसरे या बैठकीसाठी धुळ्यात असल्याने जिल्हाधिकारी महाजन यांच्या भेटीदरम्यान अधिकारी गैरहजर आढळले.
खुलासा अन् सक्त ताकीद - शिरूड येथील घटनेची माहिती घेऊन आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. यापूर्वीही बैठक घेऊन कर्मचा-यांना मुख्यालयात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही अधिकारी‑कर्मचारी मुख्यालयात थांबत नसल्याने पुन्हा पत्र पाठवून आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे. तरीही कर्मचारी गैरहजर राहिल्यास कोणतीही घटना आरोग्य केंद्रात घडल्यास वैद्यकीय अधिका-यास दोषी धरून कारवाई केली जाईल. - डॉ. डी.बी.महाले, जिल्हा आरोग्य अधिकारी