आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोजगार हमी योजनेची कामे कासवगतीने; आठ दिवसांत वेग देण्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेली अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. या कामांमध्ये मागील पाच ते सहा वर्षांतील कामांचा समावेश आहे. कामे अपूर्णावस्थेत असल्याने त्याचा लाभ नागरिकांना होऊ शकत नाहीत. त्यामुळे या कामांना आठ दिवसांत वेग देऊन ती पूर्ण करण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे.
शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी या कामासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, लहान पाट यासह वृक्षारोपण, रोपवाटिका आदी कामे केली जातात. त्यातील तांत्रिक कामाव्यतिरिक्त इतर सर्व कामे मजुरांच्या माध्यमातून करण्यात येतात. जेणेकरून स्थानिक मजुरांना आपल्या गावातच रोजगार प्राप्त व्हावा हा उद्देश योजनेचा आहे. त्यानुसार पंचायत समितीमार्फत अनेक कामे मंजूर करण्यात आली आहेत ; परंतु त्यातील बहुतांश कामे अद्यापही अपूर्ण आहेत. या कामांबाबतचा आढावा रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्याकडून पंचायत समितीत बैठक घेऊन घेण्यात आला. बैठकीला सभापती ज्ञानज्योती भदाणे, पंचायत समितीचे शाखा अभियंता, विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक उपस्थित होते. बैठकीत कामाचा आढावा घेतल्यानंतर सन 2005-06 पासूनची काही कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याची बाब पुढे आली. याबद्दल नाराजी व्यक्त करीत संबंधितांना ही कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी सूचना देऊन त्याबाबतचा आढावा आगामी आठ दिवसांत सादर करावा, अशीही सूचना शुभांगी भारदे यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान आता होणार्‍या कामांवर प्रशासनाकडून वॉच ठेवण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी या कामांचा उपजिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
2011-12 मध्ये 513 कामे अपूर्ण
पंचायत समितीकडून सन 2011-12 मध्ये रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या एकूण कामांपैकी तब्बल 513 कामे अपूर्ण आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामे अपूर्ण असल्याने योजनेचा मूळ हेतूच साध्य होत नाही. तसेच योजनेसाठी खर्च करण्यात येणारा करोडो रुपयांचा निधीही वाया जात आहे. कामे अपूर्ण असल्याने त्याचा लाभ नागरिकांनाही होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती कामे पूर्ण होणे आवश्यक आहे.
निवडणुकीपूर्वी लाभले अधिकारी
रोहयो उपजिल्हाधिकारी हे आरओचे पद आहे. त्यांच्याकडे साक्री विधानसभेची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांची बदली या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर दोन ते तीन महिने त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असल्याने कामाकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही ; परंतु निवडणुका संपल्याने त्यांच्याकडून आता कामाचा आढावा घेतला जात असताना कामे कासवगतीने होत असल्याची बाब उघड झाली.
अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
रोजगार हमी योजनेच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकारी आणि पदाधिकार्‍यांची असते ; परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच कामाला विलंब झाला आहे. गेल्या आॅगस्टमध्ये उपजिल्हाधिकारी श्री. अंतुर्लीकर यांना प्रांताधिकारीपदी बदली देण्यात आल्यानंतर सदरचे पद हे चार ते पाच महिने रिक्त होते. त्या ठिकाणी नाशिकचे व सध्याचे प्रांताधिकारी विठ्ठल सोनवणे यांची बदली करण्यात आली होती ; परंतु ते रुजू न झाल्याने हे पद रिक्त होते.