आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर पार्थिवाला मुलींनीच दिला वडिलांना खांदा अन‌् अग्निडाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिंदखेडा - मृत्यूनंतर पार्थिवाला मुलाने खांदा द्यावा आणि त्यानेच अग्निडाग द्यावा, अशी प्रथा आहे. मात्र, या सर्व रीतीरिवाजांना फाटा देत धुळे तालुक्यातील काळखेडा येथे तिघा मुलींनी वडील जिजाबराव पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. तसेच सर्वात लहान असलेल्या प्राजक्ताने अग्निडाग दिला. 
 
धुळे तालुक्यातील काळखेडा येथील जिजाबराव नंदाराम पाटील हे औरंगाबाद येथील ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना ३० जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. 
 
त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आहेत. त्यापैकी दोघी मुलींचा विवाह झालेला आहे. जिजाबराव पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कोणी करावे, असा प्रश्न निर्माण झाला. पाटील यांना चार भाऊ आहेत. त्यांना मुलं आहेत. त्यांच्या हस्ते अंत्यसंस्कार करावा, असा सल्ला काहींनी दिला. त्यासाठी रीतीरिवाज आणि धर्मशास्त्राचे दाखले देण्यात आले.
 
 वडिलांच्या मृत्यूच्या दु:खात असलेल्या मुलींपर्यंत ही चर्चा गेली आणि तिन्ही मुलींनी आपले दुःख आवरत आम्हीच आमच्या पप्पांवर अंत्यसंस्कार करू, असा निर्णय घेतला. त्यानंतर काहींनी या निर्णयाला विरोधही केला. मात्र, आमच्या पप्पांचा अंत्यसंस्कार आम्हीच करू. आम्हीच त्यांचे मुलं आहोत, असे ठामपणे पाटील यांच्या तिन्ही मुलींनी उपस्थित सर्वांना सांगितले. त्यानंतर तिघं मुली आणि जावयांनी वडिलांना खांदा दिला. तसेच प्राजक्ता या धाकट्या मुलीने जिजाबराव पाटील यांच्या पार्थिवास अग्निडाग दिला. 
 
आमदारांनी स्वीकारली जबाबदारी 
प्राजक्ताही इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. वडिलांचे निधन झाल्याने तिच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.मात्र औरंगाबादचे आमदार सतीश चव्हाण यांनी तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, जिजाबराव पाटील यांच्या तिन्ही मुलींनी वडिलांच्या मृतदेहाला अग्निडाग देऊन मुले-मुली समान असल्याचा संदेश दिल्याची चर्चा या वेळी होती. 
 
पप्पांना होता अभिमान 
‘पप्पांनी मुलगी म्हणून आम्हाला कधीही कमी लेखले नाही. त्याचबरोबर आयुष्यात कधीही स्वतःला मुलगा नसल्याची खंत व्यक्त केली नाही. तिन्ही मुलींचा त्यांना अभिमान होता. त्यांनी आम्हाला मुलाप्रमाणेच वाढवले. आम्ही तिघं बहिणी पप्पांसाठी मुलं होतो. त्यामुळे आम्हीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केला. आम्हाला रीतीरिवाजाशी काही देणेघेणे नाही’ अशी प्रतिक्रिया या तिघं मुलींनी स्वत:ला सावरत व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...