आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरेप्रकरणी खडसेंनी राजीनामा द्यावा, ‘आप’च्या आडून हितशत्रूंचे आक्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वाळूव्यावसायिक सागर चौधरी याचे पालकमंत्री खडसे यांच्याशी कौटुंबिक असलेले संबंध उघड झाल्यानंतर पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे आली आहे. खडसे मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असल्याने त्यांचा पोलिस यंत्रणेवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी खडसेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी गजानन मालपुरे, शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. दरम्यान, खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली आहे.

सागर चौधरीचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी मनपाकडे बॅनर लावण्यासाठी मागितलेल्या परवानगीचे पुरावे सादर करत मालपुरे यांनी खडसेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. शहरातील एका दरोड्यामुळे तांडव करत खडसे यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्या बदलीसाठी प्रयत्न केले होते. आता एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या पोलिस अधीक्षकांना मात्र ते पाठीशी घालत आहेत. चौधरी हा मंत्री खडसे यांचे वाळूचे व्यवसाय सांभाळत असल्याचा आरोप शिवराम पाटील यांनी केला. सागरला वाचवण्यासाठी ते यंत्रणेवर दबाव आणतील. तर गुन्हा दाखल होऊनही अद्याप पदावर असलेले पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, पोलिस निरीक्षक रायते हे सादरेंसंदर्भातील पोलिसांकडे असलेल्या रेकाॅर्डमध्ये फेरफार करू शकतात. सादरे यांच्या पत्नी माधुरी सादरे यांनी खडसेंवर आरोप केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी खडसे यांचा राजीनामा घेऊन दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच या प्रकरणाचा मास्टर माइंड शोधून त्याचे गुन्ह्यात नाव घ्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. वाळू माफियांना एमपीडीए लावण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्र्यांभोवती नेहमी वाळू माफियांचा घाेळका असतो. त्यामुळे यंत्रणा कोणावरही कारवाई करू शकत नाही. चौधरीने राजकीय वरदहस्तानेच मनोज लोहार, आनंदसिंग पाटील, राज चाफेकर, पल्लवी निर्मळ, अशोक सादरे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या असल्याचे मालपुरे म्हणाले.

लाचलुचपत विभागावर ओढले ताशेरे
३०रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करून पाठ थोपटून घेणारे लाचलुचपत विभागाचे अधिकारी ३० हजारांचे सोने मागणाऱ्या पोलिस अधीक्षकांविरुद्ध पुरावे असूनही चौकशी का करत नाहीत? सादरे यांना एसपींनी तोळे सोने मागितल्याची ऑडिओ क्लिप, पुरावे देऊनही त्यांची चौकशी झाली नाही, अशी खंत मालपुरेंनी व्यक्त केली.

तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा
वाळूव्यावसायिक सागर चौधरी आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असून पोलिस निरीक्षक सादरे प्रकरणात दबाव येऊ शकतो, यासाठी मंत्री खडसे यांचा राजीनामा घ्यावा, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करीबद्दल स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रीती शर्मा-मेनन यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. जळगाव जिल्ह्यातील माफिया राज संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे, या संदर्भात पत्र दिल्याचे प्रीती शर्मा-मेनन यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

शुभेच्छाफलक हे सागरचे प्रेम
वाळूव्यावसायिक सागर चौधरी याने शहरात विविध कार्यक्रमांना खडसे कुटुंबींना दिलेल्या शुभेच्छा प्रेमापाेटी असू शकतात. तो पार्टीचा कार्यकर्ता तर नव्हेच, साधा सदस्यदेखील नसल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सागर पार्टीचा कार्यकर्ता नाही, मग मंत्र्यांचा कार्यकर्ता आहे का? असे विचारल्यावर मात्र पदाधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले. शहरात कुणीही शुभेच्छा फलक लावले तर आपण त्याला रोखू शकत नसल्याचा दावाही जिल्हाध्यक्ष वाघ यांनी केला.

चाैधरीने लावले ६५ फलक
सागरचाैधरी यांचा महसूलमंत्री खडसेंशी संबंध नाकारला जात अाहे. मात्र, जानेवारी ते अाॅक्टाेबर २०१५ या १० महिन्यांत चाैधरीने खडसे कुटुंबीयांना शुभेच्छा देणारे तब्बल ६५ फलक शहरभरात लावल्याचे निष्पन्न झाले अाहे. यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी त्याने तब्बल १० हजार ८० रुपये खर्च केले अाहेत. यात महसूलमंत्री खडसेंच्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबरसाठी ४८०० रुपये भरून २० फलक लावण्याची परवानगी घेतली अाहे. तसेच स्व. निखिल खडसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ३० एप्रिल ते मे या कालावधीसाठी २८८० रुपये भरणा करून २० फलक लावण्याची परवानगी घेतली. त्यानंतर ११ मे राेजी खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे २५ बॅनर लावले हाेते. यास परवानगीसाठी २४०० रुपयांची पावती फाडली अाहे. विधानपरिषदेचे अामदार डाॅ. गुरुमुख जगवानी यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारीसाठी १२ फलक लावले हाेते. दरम्यान १० महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६७ फलक लावले असून यासाठी १२ हजार रुपये परवानगीवर खर्च केले अाहेत. चाैधरीने शहरात लावलेल्या बॅनर्समुळे त्याचा थेट खडसेंशी संबंध असल्याचा अनुमान काढला जात अाहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर थेट टीका करण्याचे धाडस नसलेले जिल्ह्यातील काही हितशत्रू ‘आप’च्या प्रीती शर्मा-मेनन या ट्विटर छाप महिला पदाधिकाऱ्याला हाताशी धरून आरोप करीत आहेत. हा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अशोक लाडवंजारी दीपक फालक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित सागर चौधरी हा खडसे कुटुंबीयांचा निकटवर्तीय असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न हितशत्रू करीत आहेत. खडसेंना शुभेच्छा द्यायला हजारो लाेक येतात. याचा अर्थ सगळे खासगी पातळीवर जवळचे आहेत असा होत नाही. सागर चौधरीशी तसेच सादरेंवरील कारवाईच्या कारणामागे खडसेंचा काहीही संबंध नाही, असेही पत्रकात म्हटले अाहे.

‘दिव्य मराठी’चे वृत्त प्रदेश काँग्रेसच्या फेसबुकवर
‘दिव्य मराठी’ने सोमवारी एकनाथ खडसे अन् सागर चौधरी यांच्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताने राज्यभरात एकच खळबळ उडाली. विराेधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या फेसबुकवर ‘दिव्य मराठी’चे वृत्त शेअर केले. तेथून सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल झाले.