आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी सागर पार्क मैदानावर कडकडीत बंद, पोलिस, अतिक्रमणचे पथक तैनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दुपारी महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर तर सायंकाळी सागर पार्क येथे हॉकर्स संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत निदर्शने केली. व्यवसाय करण्यास अटकाव करणाऱ्या पोलिस महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. सायंकाळपासून पोलिसांचे अतिक्रमण विभागाचे पथक तैनात होते. त्यामुळे सोमवारचा दिवस चायनिज गाड्या नसल्याने सागर पार्कवर सन्नाटा होता.

सागर पार्कवर काही तरुण उपजीविका भागवत असून त्यांना व्यवसाय करू देण्यास मज्जाव करणे व्यवहार्य नाही. हा त्यांच्यावर अन्याय असून काँग्रेसतर्फे निषेध करीत असल्याचे शहर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरींनी सांगितले. आयुक्तांची भेट घेत यावर चर्चेतून मार्ग काढावा, अशी मागणी करुन निवेदन देण्यात आले.

भांडणाचे केंद्र झालेल्या ‘सागर पार्क’वर कोणत्याच परिस्थितीत खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावू देणार नसल्याचा पुनरूच्चार करत हॉकर्सच्या मागण्या प्रशासनाने फेटाळल्या. पाठिंब्यासाठी सतरा मजलीत चकरा मारणाऱ्या हॉकर्सने राजकीय पक्षांचाही सहारा घेतला पण उपयोग झाला नाही. सोमवारी सायंकाळी सागर पार्कवर पोलिस बंदोबस्तासह अतिक्रमण विभागाचे पथक तैनात ठेवण्यात आले होते. पहिल्याच दिवशी हॉकर्स बंदीमुळे सागर पार्कवर सन्नाटा होता.

पोलिस ठाण्यात दाखल आठ गुन्ह्यांसाठी घटनास्थळ ठरलेल्या सागर पार्क हे दिवसेंदिवस असंवेदनशील होत चालले आहे. अंधाऱ्यात गैरप्रकारांसह, परिवारासह येणाऱ्या महिलांची छेडछाड करण्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. वारंवार हाणामारीच्या घटनांमुळे परिसरातील शांततेला गालबोट लागण्याची शक्यता होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना पत्र लिहून सूचनाही केली आहे. यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हॉकर्ससकाळपासून तळ ठोकून
दिनेशहिंगणे यांच्या नेतृत्वाखाली सागर पार्क येथे व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सने सकाळी ११ वाजेपासून महापालिका गाठली होती. सकाळी दुसऱ्या मजल्यावर उपमहापौरांसह आयुक्तांची प्रतीक्षा केली. परंतु कोणीही फिरकल्याने अखेर तळमजल्यावरच ठिय्या मांडला होता. त्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास उपमहापौर सुनील महाजन यांचीही भेट घेतली. परंतु वाढत्या तक्रारी लक्षात घेता सागर पार्कवर परवानगी देणे शक्य नाही. पोलिसांचेही तेच म्हणणे असल्याचे महाजन म्हणाले. आयुक्त कापडणीस यांनीही पोलिस अधीक्षकांच्या पत्राचा दुजोरा देत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

हॉकर्सचे पर्यायही फेटाळले
हॉकर्सबांधवांनी आमच्या व्यवसायावर गदा आणली जात असल्याचे मत मांडत होणाऱ्या वादास हॉकर्सचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. सागर पार्कवर पथदिव्याची व्यवस्था करावी. त्याचे बिल भरण्याची तयारी दाखवली. यासोबत त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची तयारी दर्शवली. तसेच सागर पार्कवर व्यवसाय करता येणार नसल्यास पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी केली.

यासाठी आकाशवाणी शेजारील रस्ता किंवा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर परवानगी द्यावी तसेच तो रस्ता वन वे करावा, असाही पर्याय दिला. परंतु ताे मनपाने फेटाळून लावला.

देशमुखांचा मध्यस्थीचा प्रयत्न
राष्ट्रवादीचे विनोद देशमुख युगल जैन यांनी हॉकर्सची बाजू मांडली. होणाऱ्या वादाला हॉकर्स जबाबदार कसे ठरू शकतात. हॉकर्सवर कारवाई करण्यापेक्षा टारगटांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. सागर पार्क ऐवजी पर्यायी जागा पालिकेने द्यावी, असेही ते म्हणाले.