आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sagar's Micro Chess Board Recorded In India Recordbook

सागरच्या मायक्रो चेसबोर्डची ‘इंडिया रेकॉर्डबुक’मध्ये नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- नखावर मावेल एवढा सूक्ष्म बुद्धिबळपट साकारणा-या धुळ्यातील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी सागर गलांडे विक्रमवीरांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. त्याने साकारलेल्या 12 बाय 12 एमएमच्या या मायक्रो चेसबोर्डची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. तसे प्रशस्तिपत्रक प्राप्त होताच सागरने ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊन ‘भास्कर समूहा’चे आभार मानले. सागरच्या या कारनाम्याचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते.
कल्पकता आणि नावीन्याचा ध्यास घेतलेल्या सागर तुकाराम गलांडे याला बालपणापासूनच कलेची आवड आहे. काही तरी ‘डिफरंट’ करून दाखवण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. जिद्द बाळगणा-या सागरने करंगळीच्या नखावर मावेल एवढा लहान चेसबोर्ड तयार केला होता. त्यावरील राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा आणि प्यादे हे पेन्सिलमधील शिस अर्थात लीडपासून तयार केले. या सोंगट्यांमधील सर्वात लहान काळया व पांढ-या प्याद्यांचा आकार 1.5 एमएम आहे. तर इतर सोंगट्यांच्या तुलनेत केवळ राजाचा आकार मोठा म्हणजे पाच एमएम एवढा आहे. विशेष म्हणजे हे सर्व तयार करताना सागरने कोणत्याही अत्याधुनिक साधनांचा उपयोग न करता ब्लेडच्या वापर केला होता. हा सूक्ष्म बुद्धिबळपट सागरने एका ठोकळयावर चिकटवला असून, त्यावर प्रत्येक सोंगटी मांडणे केवळ सागरलाच येते. त्याच्या या कल्पकतेची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
विक्रमवीरांच्या पंक्तीत जाऊन बसलेल्या सागरला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक असलेले डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांची स्वाक्षरी असलेले व सुवर्णाक्षरातील प्रशस्तिपत्र व मेडल प्रदान करण्यात आले आहे.
‘भास्क र समूहा’चे आभार
सागरचे वृत्त ‘दिव्य मराठी’च्या सर्व आवृत्त्यांसह दैनिक भास्करच्या दिल्ली, जयपूर, चंदिगड, जम्मू-काश्मीर, भोपाळ आवृत्तींत प्रकाशित झाले होते. हे कात्रण इंटरनेटद्वारे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवले होते. याबद्दल सागरने ‘दिव्य मराठी’ कार्यालयात येऊन आभार मानले.
सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे आपल्या कल्पकतेची दखल घेतली जाईल अथवा नाही याबाबत शंका होती. ‘दिव्य मराठी’ने वृत्त देण्यासोबत मदतही केली. भास्कर समूहाने केलेल्या मदतीमुळे देशातील विक्रमवीर होण्याचा बहुमान मिळू शकला, असेच सहकार्य मिळायला हवे.
सागर गलांडे, विक्रमवीर