आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sahebrao Patil Vehicle Accident Issue In Jalgaon

साहेबराव पाटलांच्या ‘शिस्ती’ची धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दुभाजकांनी प्रशस्त केलेल्या अमळनेरमधील रस्त्यावरून विरुद्ध दिशेने येणार्‍या एका दुचाकीस्वाराला एका चारचाकी मोठय़ा गाडीने चकवा दिला. त्यामुळे दुचाकीस्वार मागे बसलेल्या महिलेसह दुभाजकाला धडक देऊन कोसळला. हे चारचाकी वाहन आमदार साहेबराव पाटलांना घेऊन जात होते, असे ही घटना प्रत्यक्ष पाहाणारे सांगत असून आमदारांनी मात्र, असे काही घडलेच नसल्याचा दावा केला आहे.

अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांचा वाहतूक शिस्तीचा आग्रह हा सध्या अमळनेर शहरातील चर्चेचा आणि अनेकांसाठी धास्तीचा विषय बनला आहे. त्यामुळे यांच्याच गाडीने ‘रॉँग साइड’ येणार्‍या दुचाकीस्वाराला चकवा देऊन शिस्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला, या चर्चेवर अमळनेरकरांनी लगेचच विश्वास ठेवला आहे. शहरात तो एक चर्चेचा विषय बनला आहे. अमळनेर शहर अतिक्रमणमुक्त आणि वाहतूक शिस्तीचे गाव व्हावे, यासाठी आमदार साहेबराव पाटील किती आग्रही आहेत, हे अलीकडेच घडलेल्या संप आणि आंदोलनांनी जगजाहीर केले आहे. दुभाजक ओलांडून रस्ता पार करू पाहाणारे, हद्द सोडून अतिक्रमण करणारे यांनी तर आमदारांच्या कथित शिस्तीची धास्ती घेतली आहेच; पण वाहतूक पोलिसांनीही धास्ती घेतली आहे. कोणत्या क्षणी बेशिस्तीकडे दुर्लक्ष होईल आणि आमदार येतील, असे होऊ नये, यासाठी त्यांची दक्षता वाढली आहे.

असे असले तरी आमदारांची ही अतिशिस्त कोणाच्या जीवावर तर उठणार नाही ना, अशी चर्चा गेल्या आठवड्यात घडलेल्या प्रकाराने सुरू झाली आहे. दुचाकीचालकाने वाहतूकीच्या नियमांचा भंग केला होताच आणि त्यासाठी तो दोषी होताच; पण चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने घाबरून जाऊन त्याचे नियंत्रण सुटले. त्याला आणि त्याच्या मागे बसलेल्या महिलेला मोठी दुखापत झाली नसली तरी त्याचे नियंत्रण सुटणे अत्यंत धोकादायक होते. दुभाजकावर त्याचे किंवा सहप्रवाशी महिलेचे डोके आपटले असते तर कदाचित त्यांना प्राणही गमवावे लागले असते, असे ही घटना पाहाणार्‍यांचे म्हणणे आहे. या संदर्भात आपली काहीही तक्रार नसल्याचे संबंधित दुचाकीस्वाराचे म्हणणे असले तरी आमदारांची शिस्तप्रियता घातक वळण घेत असल्याच्या भावना अमळनेर शहरात व्यक्त केल्या जात आहेत.

जळगाव जिल्हा बॅंकेच्या जळगावातील मुख्य कार्यालयातही ही चर्चा पोहोचली असून तिथूनच ही माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली. त्यानंतर संबंधित प्रत्यक्षदश्रीने घटनाक्रम सांगितला. मात्र, आपले नाव जाहीर न करण्याची विनंतीही त्याने केली आहे.