आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Knew Bomb Blast? Ujjwar Nikam Questioned

सलमानला बॉम्बस्फोट कटाची कल्पना होती काय? उज्ज्वल निकम यांचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अभिनेता सलमान खानला मुंबईच्या बॉम्बस्फोटांच्या कटाची पूर्वकल्पना होती काय? ती माहिती त्याने न्यायालयासमोर का आणली नाही? त्याची उत्तरे त्याला न्यायालयासमोर द्यावी लागतील. २५७ नागरिकांच्या हत्येच्या कटातील आरोपीला निर्दोष कसे म्हणता येईल? रात्रीच्या वेळेस केलेल्या ट्विटचे महत्त्व त्याने जाणले नसेल. त्याने त्याचे म्हणणे मागे घ्यावे, अन्यथा त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी "दिव्य मराठी'ने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान दिली.
सलमान खानने शनिवारी रात्री याकूब मेमनला दिलेली फाशीची शिक्षा म्हणजे माणुसकीचा खून असल्याचे ट्विट केले होते. याबाबत अॅड. निकम म्हणाले, सलमानच्या ट्विटचे दोन मुद्दे आहेत. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य अारोपी टायगर मेमनला भारतात पाठवा, अशी मागणी केली अाहे. टायगर भारतात गुन्हा करून पाकिस्तानात पळून गेला असल्याने या विधानाला आक्षेप घेण्याचे कारण नाही. दुसरा भाग निर्दोष व्यक्तीला फाशी देणे हा माणुसकीचा खून असल्याचे बेजबाबदारपणाचे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे. २५७ नागरिकांच्या हत्येप्रकरणी दोषी याकूबला सलमान निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र कसे देऊ शकतो? या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सलमानला बॉम्बस्फोटाच्या कटाची पूर्ण कल्पना व आरोपी कोण विषयी माहिती होती. याकूब मेमन निर्दोष होता का? असे त्याने न्यायालयाला यापूर्वी का नाही सांगितले? त्याचे बेजबाबदार विधान न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारे आहे.

* चाहत्यांची केली दिशाभूल
सलमान हा आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या या ट्विटने न्याय प्रक्रियेविषयी चुकीचा संदेश गेला आहे. राष्ट्राची स्थिरता दोन बाबींवर अवलंबून असते. एक तर सामान्य माणसाचा त्या देशातील नाण्यावर असलेला गाढ विश्वास. दुसरे म्हणजे न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास. त्याच्या वक्तव्याने जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. २५७ नागरिकांच्या हत्येचे त्याला दु:ख नाही काय? दोषी ठरवल्यानंतर बेधडक विधाने करण्यात अर्थ नाही.
* याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात सरकार घाई करतेय, असा आरोप होत आहे...
याकूब मेमनला एप्रिल २०१५ मध्ये जारी करण्यात आलेल्या ब्लॅक वॉरंटची अंमलबजावणी करणे सरकारला भाग होते. त्याच्या फाशीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. फेरयाचिका व दयेचा अर्जही फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारला कारवाई करणे भाग पडतेय. कारवाई केली नसती, तर फाशीची टांगती तलवार कायम असती.
* राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी दिल्यानंतरच याकूबला फाशी द्यावी, या ओवेसींच्या विधानाकडे कसे बघता?
राजीव गांधी यांच्या एका मारेकऱ्याची शिक्षा तामिळनाडू सरकारने जन्मठेपेत कायम केलेली आहे. केंद्र सरकारने त्या निर्णयाला आव्हान दिलेले आहे. न्यायालयीन प्रक्रियेने राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांवरील कारवाईबाबत योग्य निर्णय घेतलेला आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना अगोदर फाशी द्यावी व नंतर याकूबला हा ओवेसींचा मुद्दा चुकीचा आहे.
* सलमान खान आणि ओवेसी यांनी याकूबचा कैवार घेणे कितपत योग्य आहे?
कुठल्याही धार्मिक गुन्हेगाराच्या कृत्याला धार्मिक स्वरूप देता कामा नये. एखाद्या दहशतवाद्याला शिक्षा झाल्यानंतर निरर्थक प्रश्न उपस्थित करून जनतेत संशयकल्लोळ निर्माण करणे केवळ गैरच नाही, तर बेजबाबदारपणाचे आहे. ओवेसी हे राजकीय नेते आहेत. राजकीय नेत्यांनी देशाची सांप्रदायिकता धोक्यात येईल, असे कृत्य करता कामा नये.