आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समतानगरातील अतिक्रमण अर्धवट सोडून परतले पथक, रहिवाशांनी केला विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; महापालिकेच्या महासभेत विषय गाजल्यानंतर समतानगरातील अतिक्रमण काढण्यासाठी पथक रवाना झाले. सुरुवातीला दोन-तीन घरांचे अतिक्रमणही काढण्यात आले. परंतु, स्थानिक नागरिकांनी विरोध करताच कारवाईला ब्रेक लावण्यात आला. अतिक्रमणावर शिक्कामासोर्तब करणाऱ्या अभियंत्यांनी अतिक्रमणधारकांना मागताच मुदतवाढ दिल्याने पथक अर्धवट कारवाई करून परतले.

समतानगर झोपडपट्टीजवळ संभाजीनगर चाैकातून समतानगरासाठी बांधण्यात आलेल्या जलकुंभापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून झोपड्यांचे अतिक्रमण सुरू आहे. नागरिकांनी या ठिकाणी लाकडी बल्ल्या गाडून सिमेंटचे पत्रे टाकून घरे उभारायला सुरुवात केली अाहे; तर काही जण गेल्या तीन-चार वर्षांपासून त्याच ठिकाणी राहत आहेत. जलकुंभाकरिता जलवाहिनी टाकण्याची गरज असलेल्या रस्त्यावरच घरांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे संबंधितांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या होत्या. याबाबत नुकत्याच झालेल्या महासभेत जोरदार चर्चाही झाली होती.

पैकी झोपड्या पाडल्या
याठिकाणी जवळपास आठ झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. यापैकी तीन झाेपड्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पाडून टाकल्या; तर अतिक्रमणधारकांनी माजी नगरसेवकाला फोन करून माहिती कळवताच कारवाईची गती संथ झाली. दरम्यान, अतिक्रमणधारकांचा वाढता विरोध लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्तही मागवण्यात आला होता. या वेळी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मिलिंद जगताप यांनी दिलेल्या अहवालानंतर कारवाई सुरू असताना सिंधुबाई सुरवाडे यांनी ‘घराला हात लावल्यास खबरदार’, म्हणत कारवाईला विरोध केला. वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता अभियंता जगताप यांनी अतिक्रमणधारकांना सोमवारपर्यंत स्वत: बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा जेसीबीने पाडण्याचा इशारा दिला.

व्याजाचे पैसे काढून उभारला निवारा
समतानगरच्या १२ मीटर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या झोपड्यांपैकी एका महिलेने व्याजाने पैसे घेऊन निवारा उभारला होता. छतासाठी पत्रे खरेदी केले नसल्याने रहिवास सुरू केला नव्हता. परंतु, पालिकेने अचानक कारवाई सुरू केल्याने पत्रे खरेदीसाठी काढलेले व्याजाचे पैसेही वाया गेल्याचे बोलले जात होते.