आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दीच्या वादातून वाळू व्यावसायिकाला थेट घरात घुसून बेदम मारहाण; डंपर पेटवण्याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी झालेले वाळू व्यावसायिक विकास पाटील. - Divya Marathi
जखमी झालेले वाळू व्यावसायिक विकास पाटील.
जळगाव - जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री नेरी परिसरातील अवैध वाळू उपसा करताना हद्दीच्या वादावरून नेरी येथील १० ते १५ जणांच्या टाेळक्याने जळगावच्या रायसोनीनगरातील वाळू व्यावसायिकाला त्याच्या घरी जाऊन बेदम मारहाण केली. तसेच ‘नेरी परिसरातील हद्दीत डंपर आल्यास ते पेटवून देऊ’ अशी धमकीही टाेळक्याने दिली.
 
एवढेच नव्हे तर वाळू व्यावसायिकाच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन डंपरच्या काचाही फोडण्यात आल्या. गँगवाॅरची घटना होऊन २४ तासही उलटत नाही तोच गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात अाले. यामुळे वाळू चोरट्यांवर महसूल आणि पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे दिसून आले असून वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे.
 
जिल्ह्यातील वाळू गटांच्या लिलावाची ३० सप्टेंबर रोजी मुदत संपली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ४८ वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत वाळू उपशांवर बंदी आहे. मात्र, तरीही जिल्हाभरात मोठ्याप्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असून महसूल प्रशासन पाेलिस यंत्रणा गप्प अाहे.
 
बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजता नेरी येथील जयेश पाटील, धनराज कोळी यांच्यासह १० ते १५ जणांचे टोळके जळगावच्या रायसोनीनगर रहिवासी वाळू व्यावसायिक विकास पाटील (वय ५५) यांच्या घरी गेले. या टोळक्याने पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या घरासमोर लावलेल्या दोन डंपरच्या (क्रमांक एम.एच.१९ सी. वाय. ९१७१ आणि एम.एच.१९ झेड ९१७१) काच फोडण्यात आल्या. आमच्या वाळू उपशाच्या हद्दीत तुमचे डंपर आणू नका. यापुढे आमच्या हद्दीत डंपर आल्यास आग लावून देवू,अशी धमकीही या टोळक्याने पाटील यांना जाता-जाता दिली.दुखापत होऊन धास्तावलेल्या पाटील यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती पाटील यांच्या दोघा मुलांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.
 
दरम्यान, हाणामारीचा प्रकरण पोलिसांमध्ये गेल्यास अंगलट येऊ शकते हे ध्यानात येताच इतर वाळू व्यावसायिकांनी मध्यस्थी करुन दाेन्ही गटातील नागरिकांची समजूत काढून हा वाद मिटवला. त्यामुळे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

काय दिली धमकी
टाेळक्यानेविकास पाटील यांना ‘नेरी परिसरातील हद्दीत डंपर आल्यास ते पेटवून देऊ’ अशी धमकी दिली. तसेच बेदम मारहाण केली. यात ते जखमी झाली असून त्यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू अाहे.
 
जप्त केलेले ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवले
डी-मार्टजवळून वाळू चोरून घेऊन जाणारे ट्रॅक्टर मंडळ अधिकारी रवींद्र उगले यांनी गुरुवारी सकाळी पकडले. या ट्रॅक्टरच्या क्रमांकामध्ये खाडाखोड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ते ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून लावले. त्याची किल्लीही त्यांनी काढून घेतली. त्यानंतर वाळू चोरट्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून ट्रॅक्टर पळवून नेले. याबाबत फिर्याद देण्यासाठी मंडळ अधिकारी उगले जिल्हापेठ पोलिस ठाण्यातही आले होते. नंतर मात्र, चाेरट्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर आणून लावले. विशेष म्हणजे याप्रकरणी कोणतीही तक्रार देता उगले पोलिस ठाण्यातून माघारी परतले.
 
परस्पर हद्द ठरवण्यापर्यंत गेली मजल
वाळू गटांच्या लिलावाची मुदत संपली असून नव्याने लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे जिल्हाभरात नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा जोरात सुरु आहे. अवैध वाळू उपसा वाहतुकीवर महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई केली जाते.महसूल यंत्रणा आणि पोलिस कर्मचाऱ्यांशी मिलिभगत करून वाळू माफिया गिरणा नदीपात्रांतून दिवस-रात्र अवैध उपसा करीत आहेत. यात तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावखेडा, खेडी, फुपनगरी या वाळू गटांचा समावेश आहे. यातूनच अवैध वाळू उपसा करण्यासाठी हद्द ठरवण्यापर्यंत वाळू चोरट्यांची मजल गेली आहे. या हद्दीच्या वादामधूनच चोरट्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...