आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर तालुक्यात वाळू-चारा वाहतुकीस तलाठी ठरणार दोषी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर - ज्या शिवारातून वाळू, लाकूड, चारा यांची अवैधपणे वाहतूक केली जात असेल त्याठिकाणी संबंधित ग्रामसेवक, तलाठी यांना जबाबदार धरावे, अशी मागणी आमदार साहेबराव पाटील यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीत केली. या मागणीवर प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे यांनी तशी कारवाई केली जाणार असल्याचे सुतोवाच केले. तसेच ज्या क्षेत्रातून अवैधपणे वाळूवाहतुकीत ग्रामपंचायत सदस्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावर ‘14-अ’ प्रमाणे कारवाई करून ती ग्रामपंचायत कमिटी जिल्हाधिकार्‍यांकडून अपात्र ठरविण्यात येईल, अशीही माहिती प्रांताधिकार्‍यांनी आढावा बैठकीत दिली.

येथील राजसारथी सभागृहात रविवारी सायंकाळी पाणीटंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील 25 गावांना आज पाणीटंचाईची झळ पोहचली आहे. या गावांमध्ये 27 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत तर 33 गावांमध्ये पाण्यासाठी वणवण सुरू आहे. त्यातील 2 गावांना टँकर सुरू असून 4 गावांना टँकर मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, या गावातील नागरिक अद्याप टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. बैठकीला तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी बी.एस.पाटील, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता एस.बी.सोनवणे यांच्यासह भूजल विभाग तसेच इतर विविध विभागातील कर्मचारी व तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक यांची मोठी उपस्थिती होती.


पाण्यासाठी मारामार्‍या
भोकरबारी धरणात विहीर असून ती विहीर र}ापिंप्री गावासाठी पाणीपुरवठा विभागाकडून खोदण्यात आली आहे. मात्र त्यावर भोकरबारी ग्रामस्थांनी हक्क सांगितला. यावरून दोन गावांच्या चक्क मारामार्‍या सुरू असल्याची माहिती आमदार साहेबराव पाटील यांनी सभागृहात दिली.


अक्कलपाडा धरणातून पांझरेत पाणी सोडणार
अमळनेर तालुक्याजवळून वाहणार्‍या पांझरा नदीकाठावरील गावांना पाणी मिळावे, यासाठी धुळ्याचे आमदार शरद पाटील, अमळनेरचे आमदार साहेबराव पाटील, साक्रीचे आमदार योगेश भोये, शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल या चार आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदींना संयुक्त पत्र देण्यात आले. या चारही आमदारांनी पांझरा नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी 15 मार्च रोजीच केली आहे. तेव्हा कुणीही ‘उपटसुंभ’ याचे र्शेय घेत असेल तर त्याला ही बाब सांगा, अशी माहिती आमदार साहेबराव पाटील यांनी या वेळी दिली. याबाबत आवर्तन सोडण्याचा ठराव करा, अशी मागणीही काही नेते सांगत असल्याची माहिती ग्रामसेवक देत होते, त्यावर आमदार साहेबराव पाटील यांनी उत्तर दिले.


अशी आहे आजची स्थिती
वर्षभर पाणीटंचाईची गावे : देवगाव-देवळी, ढेकू खुर्द ,दहिवद खुर्द, दहिवद, टाकरखेडा, धार, कंडारी खुर्द, लोणे, पाडसे.
जानेवारी 2013 पासून टंचाईग्रस्त : चौबारी, खेडी बुद्रूक, पळासदळे, हेडावे, नगांव बुद्रूक, धुपी, सोनखेडी, मांजर्डी, ढेकू बुद्रूक, ढेकूसिम, एकतास, मुडी (प्र.डांगरी), बहादरवाडी, सारबेटे खुर्द, कुर्‍हे बुद्रूक.
टँकर सुरू असलेले गाव : डांगर बुद्रूक, लोणपंचम.
टँकरची प्रतीक्षा : कचरे, मंगरुळ, तळवाडे, लोणचारम तांडा.
तात्पुरत्या मंजूर पाणी योजना : झाडी, मांजर्डी, गोवर्धन.
विहीर खोलीकरण प्रस्ताव : गडखांब, धुपी, लोंढवे, अटाळे, एकरुखी, जुनोने.