आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांची प्रशासनावर ‘नजर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विनाभांडवली कोट्यवधीची कमाई करून देणारा ‘उद्योग’ म्हणून वाळूच्या धंद्यात हजारो लोक गुंतले आहेत. वाळू राखण करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेवर पाळत ठेवण्यासाठी शहरात तब्बल 100 जणांची टीम कार्यरत आहे. शासकीय कार्यालये, पथकातील कर्मचारी, अधिकार्‍यांचे निवासस्थान आणि नदीपर्यंतच्या टप्प्यातील प्रमुख हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या टीमचे सदस्य करीत आहेत. अधिकार्‍यांनी नदीपात्रात जाऊन केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये काही मजुरांनी माफियांच्या ‘वाळू मॅनेजमेंट’चे गुपित उकलले.

वरवर साधा, सरळ वाटणारा वाळूचा धंदा आता प्रशासनाच्या अंगलट आला आहे. वाळूमाफियांची मुजोरी मोडीत काढण्याचे मनोधैर्य पोलिस यंत्रणेतही नसल्याने झटपट र्शीमंत होण्यासाठी वाळूचे कण रगडण्यासाठी ‘व्हाइट कॉलर’ म्हणवणारेही रात्रीच्या अंधारात नदीपात्रात उतरल्याची स्थिती आहे. तलाठय़ावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाळू उपसा रोखण्यासाठी नियुक्त पथकाने केवळ माहिती घेण्यासाठी वेगळ्या मार्गाने नदीपात्र गाठले. या वेळी नदीपात्रात वाळू जमा करण्याचे काम करणार्‍या मजुरांना तहसीलदार कैलास देवरे यांच्या पथकाने विश्वासात घेतले. कारवाई करणार नाही याची हमी दिल्यानंतर एका मजुराने ‘वाळू व्यवस्थापना’चे गुपित उकलले. ‘साहेब, खरं सांगू का, तुम्ही येणार हे आम्हाला आधीच माहिती होते. म्हणूनच येथे एकही ट्रॅक्टर नाही.’ अगदी तुम्ही सकाळी घर केव्हा सोडले, कार्यालयातून केव्हा बाहेर आले याची सारी हकिकत त्याने सांगितली तेव्हा सारेच अवाक् झाले.

मजुरांना रात्रीतून मिळतात हजार-पाचशे
वाळू वाहून नेण्यासाठी माफियांचे काही अलिखित नियम आहेत. तसेच सशुल्क सेवाही उपलब्ध आहे. रोजंदारीचे पैसेही अधिक असल्याने या व्यवसायात कधीच मजुरांची टंचाई भासत नाही.

लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा कार्यरत
गतवर्षी वाळू वाहतूक करणार्‍यांची 15 ते 20 मुले वाहने घेऊन अधिकारी आणि तलाठय़ांवर लक्ष ठेवून असत; मात्र वाळू वाहतूक करणारे वाढल्याने सर्वांना एकच सेवा देणारी टोळी तयार झाली. तलाठी, तहसीलदार आणि प्रांतांच्या घरापासून ते ऑफिसपर्यंतच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 100पेक्षा अधिक लोक आहेत. त्यांच्याकडे असलेल्या ग्रुप मोबाइलवरून सारी माहिती तत्काळ मिळते. तहसील कार्यालयातून निघालेली गाडी नदीपात्रात पोहोचण्यापूर्वी तेथून गाड्या काढण्यासाठी बराच वेळ मिळतो. तसेच काही अधिकारी मुलांची शाळेत केव्हा ने-आण करतात, तर बाजारात केव्हा जातात याचीही माहिती असते.

गाळलेली वाळू तयार
नव्याने वाहतूक करणार्‍यांना नदीपात्रात वाळूचा शोध घेण्याची गरज नसते. त्यांना गाळलेली वाळू उपलब्ध करून देणारीही वेगळी यंत्रणा आहे. वाळू उकरून, गाळून ट्रॅक्टरमध्ये भरूनदेखील दिली जाते. त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. नव्या माफियांना ट्रॅक्टर नदीपात्रातून काढून देण्यासोबत ग्राहक मिळवून देण्या यंत्रणा कार्यरत आहेत.

प्रशासकीय यंत्रणा पडली गोंधळात
माफियांवर मात करून वाळू उपसा थांबवण्याची क्षमता शासकीय यंत्रणेत नसल्याने वाळूचे लिलाव हाच उपाय असल्याची बाब अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तथापि, मोफत वाळू मिळत असल्याने लिलावात सहभाग घ्यायचा नाही, असा निर्धार माफियांनी केला आहे.

30 कोटींचा बुडतोय महसूल
वाळूच्या लिलावातून प्रशासनाला सरासरी 30 कोटी रुपये उत्पन्न मिळते. शासनाने दिलेले 100 कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मोठा वाटा वाळूच्या माध्यामातून मिळत असलेल्या उत्पन्नाचा आहे. वाळूमाफियांचे लॉबिंग गेल्या वर्षी यशस्वी झाल्याने प्रशासनाला हे उत्पन्न मिळू शकले नाही. यावर्षी लिलावासाठी पर्यावरण विभागाकडे परवानगी मागितली असून त्यासंदर्भाची प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, माफियांच्या लॉबीवर लिलावाचे भवितव्य अवलंबून आहे. शासनाला दमडीही न भरता 100 कोटींपेक्षा अधिक रुपये कमवता येत असल्याने प्रशासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.

ट्रॅक्टरमुळे गावकरी त्रस्त
दोन महिन्यांपूर्वी वाळूच्या वाहतुकीमुळे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जळगाव शहरातील एका बालिकेचा मृत्यू झाला. तर वाळूच्या उपशामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या कृत्रिम डोहात बुडून जळगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. रात्रीच्या वाहतुकीतून नदीकाठच्या रहिवाशांनाही जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याची स्थिती आहे. गावकरी वाळूमाफियांच्या उपद्रवाने त्रस्त असले तरी गुंडगिरीमुळे त्यांचा विरोधही करता येत नाही.

पळण्याच्या प्रयत्नात डंपर उलटला
तलाठय़ावर हल्ल्याची घटना ताजी असताना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता निमखेडी शिवारात वाळूचा उपसा सुरू होता. तहसीलदारांचे पथक येत असल्याची बातमी कळताच एक ट्रॅक्टर आणि डंपरच्या चालकांनी नदीपात्रातून ते घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र घाईने निघण्याच्या प्रयत्नात ते उलटले. डंपर आणि ट्रॅक्टर प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. आता वाहनमालकांचा तपास करण्यात येत आहे.