आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक लाख रुपये लाचेची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची खळबळजनक तक्रार दोन वाळू ठेकेदारांनी केली आहे. रविवारी रात्री या प्रकरणामुळे रामानंद पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी उपअधीक्षक किशोर पाडवी यांना चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिले आहेत.

गिरणा नदीपात्रातून उपसा करून वाघनगर घाटातून वाळू आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणारे चार डंपर रविवारी दुपारी रामानंदनगर पोलिसांनी पकडले होते. चार पैकी दोन डंपरमध्ये (क्रमांक एमएच- १०, झेड- ४०५३, एमएच- १९, झेड- ५८५८) वाळू होती तर एका डंपरमध्ये (क्र. एमएच-१९, झेड- ४७५३) मुरूम होते. एक डंपर (क्र. एमएच- १८, एए- ८६५) रिकामे होते. रामानंदनगर पोलिसांनी हे चारही डंपर जप्त केले होते. या प्रकरणी वाळू ठेकेदार रवींद्र सोमा चाैधरी सागर चौधरी यांना पोलिस निरीक्षक सादरे यांनी रविवारी दुपारी आधी फोन करून पैशांची मागणी केली. त्यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सादरे यांनी त्यांच्या निवासस्थानी या दोघांना बोलावले रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एक लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस ठाण्याच्या प्रमुखाविरुद्ध लेखी तक्रार आल्याने रात्री रामानंद पोलिस ठाण्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सुपेकर यांनी रात्री पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यांनी उपअधीक्षक किशोर पाडवी यांना बोलावून या प्रकरणाची चौकशी सोपवली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक सुपेकर यांनी सांगितले.

चौकशी अंती कारवाई
पोलिस निरीक्षकांविरोधात लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची चौकशी सुरू झाली आहे. चौकशीनंतर दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे. किशोरपाडवी, पोलिस उपअधीक्षक