आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE - सूर्यकन्येला ओरबाडताहेत वाळू व्यावसायिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर - चोेपडा तालुका हद्दीत तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचे अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे. या उत्खननाजवळच काही अंतरावर जळोद पूल व अमळनेर पालिकेची पाणीपुरवठा योजनेची विहीर आहे. वाळू उपशाच्या सपाट्यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. वाळू उत्खनन व वाहतुकीचे नियम धाब्यावर ठेवून सर्रास वाहतूक सुरू आहे.
तापी नदीपात्रात चार पोकलॅँड, चार वाळू कोरणार्‍या बोटींनी अहोरात्र उपसा सुरू केला आहे. बोटींचा वापर व पोकलॅँड मशीनची परवानगी आहे किंवा नाही, याबाबत प्रशासनाला नेमकी माहिती नाही. हे उत्खनन पाहता दररोज सुमारे 500 ट्रक वाळू उपसा होतो. दर पाच मिनिटाला एक ट्रक वाळूचा पोकलॅँड मशीनच्या सहायाने भरला जातो. रात्रभर शहरातून वाळूचे ट्रक वाहतूक करीत असतात. तर काही ट्रक पारोळामार्गे धावतात.

वाळूत मुरतेय ‘पाणी’
शासकीय महसूल कर्मचार्‍यांना ही अवैध वाळू वाहतूक दिसत नाही का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. मात्र, वाळूत मोठ्या प्रमाणावर ‘पाणी’ मुरत असल्याने प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी बांधल्याचेच चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापी नदीला अजून पाणी न आल्याने प्रचंड उपशामुळे हे ‘पाणी’ वाळूत मुरत असल्याचे उत्तर दडले आहे. अधिकार्‍यांचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. यंदा मात्र धडक कारवाईची मोहीमच थंडावली आहे. जुजबी कारवाई करून कारवाई केल्याचा आव शासकीय अधिकारी आणत आहेत. याशिवाय राजकीय वरदहस्त असल्याने वाळूत अधिक ‘पाणी’ मुरण्यास मदत होते. एका माजी आमदारांचा सुपुत्र यात भागीदार आहे.

या आहेत उत्खनन खाणी
जळोदजवळ वाळकी, बुधगाव, मालखेडा, धावडे, जळोद या ठिकाणी वाळू ठेका देण्यात आलेला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने येथील खड्ड्यात पाणी साचले आहे. येथून धुळे व नाशिक येथे जाणारी वाहतूक अमळगाव, जळोद याच भागातून होते.
एवढी होती परवानगी
वाळू उपसाबाबत बुधगाव (2) 30 हजार 430 ब्रास, मालखेडा 26 हजार 680 ब्रास, जळोद (2) 30 हजार 430 ब्रास वाळू उपशाची परवानगी होती.

अहवालानंतरही होतोय उपसा
आमदार साहेबराव पाटील यांच्या तक्रारींवरून तहसीलदारांनी अहवाल तयार केला. प्रांताधिकार्‍यांनी 9 मे 2014 रोजी खनिकर्म अपर जिल्हाधिकार्‍या ंकडे जळोद (2) चा पुष्पचंद्र वाळू कॉन्ट्रॅक्टरने अटींचा भंग केलेला आहे. त्यामुळे ठेका रद्द करावा, असा अहवाल पाठवला होता. 15 मे 2014 रोजी मालखेडा बुधगाव (2) हे चंद्रकांत सपकाळे, रा.फुपनगर (जळगाव) यांचे ठेके रद्द करावे, असे अहवाल पाठवले होते. तरीही उपसा सुरूच आहे.

पालिकेतर्फेही पाहणी
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेपासून काही अंतरावर वाळू उपसा सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी पालिकेचे उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे, पाणीपुरवठा सभापती संजय पाटील, नगरसेवक राजू फाफोरेकर, योगेश पाटील यांनी मंगळवारी पाहणी करून वाळू उपसा थांबवण्यासाठी तत्काळ प्रांताधिकार्‍या ंची भेट घेतली. अमळनेर शहराची पाणीटंचाईबाबत समस्या सांगितली.

अटी व शर्तींचा भंग
सेक्शन मशीन (बोट)आपत्कालीन स्थितीतच वापरता येते. त्यासाठी शासनाची व भूजल खात्याची परवानगी घ्यावी लागते, तरच ते वापरता येते. सूर्योदयानंतर 6 वाजता व सूर्यास्तानंतर 6 वाजेपूर्वीच वायू उत्खनन करता येते. वाहतूक करताना वाळूस ताडपत्रीने झाकावी लागते.

स्थगितीच नको तर ठेक्केच रद्द करा
याबाबत प्रांतांनी पाठवलेल्या अहवालानंतरही उत्खनन सुरूच आहे. व्यावसायिक उपसा करत करत थेट पालिकेच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे अमळनेरकराचा पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ठेक्याला स्थगिती दिली आहे. मात्र, स्थगितीच नको तर ठेकेच रद्द करण्यात यावे, असे मत आमदार साहेबराव पाटील यांनी व्यक्त केले.
मशीनसंदर्भात तपासणी करणार
४याबाबत आपण त्यांना दिलेल्या ठेक्याची फाइल तपासून बोटी व पोकलॅँड मशीनला कायदेशीर परवानगी आहे किंवा नाही तपासून संबंधितांवर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेला आहे. याप्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
अजय मोरे, प्रांताधिकारी, अमळनेर.