आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ तालुक्यात गौणखनिजाची तस्करी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - गौणखनिज तस्करांविरुद्ध महसूल विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत महसूलतर्फे 69 वाहनांवर कारवाई झाली. तर वाहनधारकांकडून 11 लाख 21 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईच्या या सत्रानंतरही तालुक्यातील गौणखनिजाची अवैध वाहतूक थांबलेली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या कारवाईचा बार फुसका ठरल्याची स्थिती आहे. त्यामुळे तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांच्या पथकाने गौणखनिज तस्करांविरुद्ध सरळ गुन्हे दाखल करण्याची गरज आहे.


तापी आणि वाघूर नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणावर वाळूचा उपसा सुरू आहे. तसेच डबरासाठी पात्रातील खडकही फोडले जात आहेत. गेल्याच महिन्यात शहरात मोठय़ा प्रमाणात वाळूचा साठा बेवारसस्थितीत आढळला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या पथकाने हा साठा जप्त केल्यानंतर तस्करांचे धाबे दणाणले. तरीही गौणखनिज वाहतूक थांबलेली नाही. शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी वापरली जाणारी रेती कुठून आणली जाते, याची चौकशी होणे गरजेची आहे.

जानेवारीत 29 वाहनधारकांवर झालेल्या कारवाईत तीन लाख 56 हजार 560 रुपयांचा दंड वसूल झाला. तर फेब्रुवारीत 27 वाहनधारकांवरील कारवाईत सहा लाख 21 हजारांचा आणि मार्च महिन्यात 13 वाहनधारकांकडून एक लाख 43 हजार 330 रुपयांचा दंड वसूल झाला. अशाप्रकारे तीन महिन्यात एकूण 69 वाहनधारकांकडून 11 लाख 21 हजारांचा दंड वसूल झाला.

पथक नियुक्त करू

शासनाची रॉयल्टी चुकवून मोठय़ा प्रमाणावर गौणखनिजाची चोरटी वाहतूक करणार्‍यांविरुद्ध पुन्हा कारवाईचा धडाका सुरू करणार आहे. त्यासाठी प्रांत कार्यालयाचे पथक नियुक्त केले जाईल. याबाबत कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही. राहुल मुंडके, प्रांताधिकारी