आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वडार वेदना’मुळे सुरू केली गरिबांची सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पुस्तके माणसाचे आयुष्य बदलून टाकतात. लेखक, साहित्यिकांचे पुस्तकांमधून प्रकट होणारे विचार आचरणात आणल्यास त्यातून काही चांगली कामे घडतात. याचे एक उत्तम उदाहरण शहरात पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ लेखक लक्ष्मण गायकवाड यांचे ‘वडार वेदना’ हे पुस्तक वाचून शहरातील केशकर्तनाचा व्यवसाय करणारे संदीप जगताप यांनी आपले वातानुकूलित केश कर्तनालयातून वेळ काढत आठवड्यातून तीन दिवस गोरगरीब मुलांचे मोफत केशकर्तन करण्याची सेवा सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी हा छंद वजा सेवा अविरत सुरूच ठेवली आहे. आयुष्यातील हा सकारात्मक बदल त्यांनी ‘वडार वेदना’ हे पुस्तक वाचून केल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
जगताप यांचे प्रतापनगर येथे ‘सीझर पॅलेस’ नावाचे वातानुकूलित केश कर्तनालय आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते केशकर्तनाचा व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना वाचन, नाट्य क्षेत्राची आवड होती. अद्यापही त्यांचे वाचन सुरूच आहे.
गरिबांची मुले आपल्या सलूनमध्ये येऊ शकणार नाहीत. त्यामुळे आपण स्वत:च त्यांच्यापर्यंत पोहोचून सेवा दिली पाहिजे, असा विचार जगताप यांच्या मनात ‘वडार वेदना’ पुस्तक वाचल्यानंतर आला. त्यांनी हा विचार पत्नी वंदना मुलगा विशाल यांना सांगितला. कुटुंबीयांनी त्यांच्या या विचाराला बळ दिल्यामुळे जगताप यांनी आठवड्यातीन तीन दिवस गरिबांच्या मुलांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला अन‌् तो तडीस नेला.
काय आहे ‘वडार वेदना’ पुस्तकात?
वेठबिगारीच्या काळात वडार समाजाच्या अनेक उपजाती तयार झाल्या. वड्डर म्हणजे दगड फोडणारा, पाथरूट म्हणजे रस्ता तयार करणारा, गाडी वड्डर म्हणजे आपल्या बैलगाडीतून दगड घेऊन जाणारा बांधकाम करणारा अशा कामांवरून वडार समाजाला ही वेगवेगळी ओळख मिळाली. कायमच उपेक्षित राहिलेल्या समाजाचे दु:ख लक्ष्मण गायकवाड यांनी ‘वडार वेदना’ या पुस्तकातून मांडले आहे.
...अशी देतात सेवा
सुरुवातील त्यांनी अंध, अपंग, गतिमंद मुलांचे मोफत केशकर्तन केले. आता सोमवार, बुधवार शनिवारी ते स्वखर्चाने जवळपासच्या खेड्यात, बंजारा तांडा, वेठबिगार, आदिवासी झोपड्या, उतारकरू यांच्याकडे जाऊन तेथील मुलांचे केशकर्तन करतात. या शिवाय आषाढी एकादशीनिमित्ताने पायी पंढरपूर दिंडीत सहभागी होऊन पदयात्रा करणाऱ्या भाविकांना मोफत सेवा देत असतात.
वाचनातून सेवा करण्याचा विचार मिळाला
- ३० वर्षे व्यवसाय केल्यानंतर वाचनातून गरिबांची सेवा करण्याचा विचार मनात आल्यामुळे ही छोटीशी सेवा पुरवण्याचे काम करत आहे. भविष्यात यापेक्षा जास्त सेवा देण्याचा मानस आहे.
संदीप जगताप, संचालक, सीझर पॅलेस केश कर्तनालय
बातम्या आणखी आहेत...