आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ: शहरात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी नगरपालिकेने कार्यालयाच्या इमारतीत साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय सुरू केले होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ते स्थलांतराच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांची गैरसोय होत आहे. पालिका पदाधिकार्यांनी हे वाचनालय पूर्ववत सुरू करण्यासाठी कृतीशील पाऊल उचलावे, असा सूर शहरातील वाचनप्रेमींकडून उपस्थित केला जातो आहे.
युवा वर्गाला वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्दात हेतूने 40 वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष डी.के.चौधरी यांच्या कारकिर्दीत नगरपालिकेच्याच इमारतीत वरणगावरोड व पालिका अशा दोन्ही बाजूने दरवाजा असलेले साने गुरुजी यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले होते. वाचकांसाठी पर्वणी असलेल्या या वाचनालयात सात लाख रुपये खर्च करून सर्व प्रकारचे वर्तमान पत्र सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरीविषयक माहिती असलेले पुस्तके, नामवंत लेखकांच्या कथा, कांदबरी, मासिके अशा असंख्य वाचनिय पुस्तकांचा संग्रह ठेवण्यात आला होता. त्यावेळी करमणुकीसाठी इतर साधनांचा अभाव असल्याने सकाळपासूनच वाचकांची नगरपालिकेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात लक्षणीय गर्दी होत असे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले साने गुरुजी वाचनालय सर्व वाचक वर्गाला सोयीचे होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून वाचनालय स्थलांतरीत करण्याच्या नावाखाली बंद करण्यात आले आहे. शहरात खासगी संस्थांचे आठ सार्वजनिक वाचनालये सद्यस्थितीत सुरू आहेत. त्यापैकी यावल रोडवरील सार्वजनिक वाचनालयाला ’अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पालिकेने साने गुरुजी वाचनालय पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, असा सूर शहरातील वाचकांमधून उमटू लागला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.