आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया कादरीसह पाच जणांना मिळाली न्यायालयीन कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - समीर पिंजारीवर गोळीबारप्रकरणी सानियासह पाच संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सानियासह तिचे वडील, मनोज वालेचा आणि दोन अंगरक्षकांना 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश अ.मा. पाटणकर यांनी दिले.
गुरुवारी (ता. 5) दुपारी बसस्थानकाजवळ बांधकाम व्यावसायिक सानिया कादरीने केलेल्या गोळीबारात समीर अख्तर पिंजारी हा युवक गंभीर जखमी झाला होता. याबाबत येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सानिया व अन्य संशयितांना तीनेवेळा पोलिस कोठडी मिळाली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकील नवाब अहमद यांनी, मनोज वालेचा याच्याकडील रिव्हॉलवर जप्त करायचे राहिले आहे. संशयित तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगून पुन्हा पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तर सानिया कादरीचे वकील अ‍ॅड. ए.ए. शेख यांनी, संशयितांना आतापर्यंत 11 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्यामुळे आता पुन्हा पोलिस कोठडी देवू, नये असा युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पाटणकर यांनी सानिया, तिचे वडील सय्यद कादरी, मनोज वालेचा तसेच दोन अंगरक्षक आमीर खान व शेख जमाल यांना सात दिवसाची (ता. 23) न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, सुनावनीनंतर सानियाच्या नातेवाईकांनी तिची भेट घेतली. पोलिस निरीक्षक दिलीप पगारे, निरीक्षक नजीर शेख, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत खुळे, अरविंद जोंधळे, पी.बी. भोंडवे यांनी बंदोबस्त ठेवला. सानियाला पाहण्यासाठी न्यायालयाच्या आवारात गर्दी झाली होती.