आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Savkare In Bhusawal Municipal Corporation

मंत्रिपदानंतरच दाखवला पालिकेने विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मंत्री झाल्यावर का होईना पालिकेत बोलावून मी शहरातील समस्या सोडवू शकतो, असा विश्वास दाखवण्यात आला. मात्र, पालिकेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आमदारकीच्या काळातही मदतच केल्याची कोपरखळी कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी मारली. पालिकेने ‘एनओसी’ दिल्यास पावसाळ्यानंतर 10 कोटी रुपये निधी वापरून शहरातील सर्वच रस्ते चकाचक करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

पालकमंत्री सावकारे यांचा सोमवारी पालिका सभागृहात सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्तविकातून शहरातील समस्या सोडवण्याचे साकडे घातले. गटनेते आणि नगरसेवकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्र्यांनी राज्यातील सर्वच पालिकांना लोकसंख्येच्या आधारावर विशिष्ट निधी मिळतो. आमदार झाल्यावर पहिल्या आणि दुसर्‍या वर्षी पालिकेला तब्बल दीड कोटी रुपये निधी शहर विकासासाठी दिला. मात्र हा निधी कुठे खर्च झाला? हे मला देखील माहित नाही. सोबतच शहरात तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, ट्रामा सेंटर, क्रीडा संकूल, तीन स्वतंत्र सबस्टेशन आदींना मंजुरी मिळवली हे लक्षात आणून दिले. पालिकेच्या कामकाजाविषयी रोष व्यक्त करताना, पाच मिनिटांत 36 विषयांना मंजुरी मिळते. विरोधी नगरसेवकांना बोलू दिले जात नाही. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक सूचना आहे. सभागृहात सर्वच सदस्यांना बोलू दिल्यास नवीन योजना सूचतील. पेंशनर्स कर्मचार्‍यांना नियमित वेतनासह कर्मचार्‍यांशी उर्मट वागणूक थांबावी. त्यांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

निर्मल कोठारी म्हणतात, तर एक लाख रुपये देऊ
पालिकेचे माजी आरोग्य सभापती निर्मल कोठारी यांनी सफाईसाठी कंत्राटी कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पालिका असा प्रयत्न करणार असेल तर आपण स्वत: एक लाख रुपये देऊ. यामुळे शहर 15 दिवसांत स्वच्छ होईल. पाणीपुरवठय़ाचा प्रकल्प बदलणे आवश्यक आहे. पालिकेने यासाठी प्रस्ताव दिल्यास मंजुरी मिळवू.

पाणीटंचाईवर योग्य उपाय हवा
सहा महिन्यापासून शहरात टंचाई आहे. तापीला पूर आल्यावरही समस्या सुटलेली नाही. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली असून घंटागाड्या मिळणे आवश्यक आहे. फक्त दोन मिनिटांत सभा उरकून आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही. अजय भोळे, गटनेते, भारतीय जनता पार्टी

200 कोटींचे पॅकेज हवे
पालकमंत्री संजय सावकारेंच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी 200 कोटींचे स्वतंत्र पॅकेज मिळाल्यास रस्ते, पाणी, आरोग्य या समस्या सुटतील. शहरातील उत्तर वॉर्डाच्या विकासासाठी भरीव प्रयत्न होणे आवश्यक आहे. उदयसिंग काके, उपगटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

सर्वांना न्याय मिळावा
आमदार सावकारेंच्या रुपाने मिळालेल्या मंत्रिपदाचा लाभ सर्वपक्षीयांना व्हावा. शहरातील प्रत्येक व्यक्ती करदाता असल्याने पक्षीय भेद बाजूला सारून समप्रमाणात न्याय आणि विकास अपेक्षित आहे. किरण कोलते, गटनेते, खाविआ

मंत्र्यांनी मदतीचा हात द्यावा
शहर स्वच्छतेसाठी 47 घंटागाड्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी. कर्मचारी अपूर्ण असल्याने कामे होत नाहीत, यामुळे रिक्त पदे भरावीत. यासाठी पालकमंत्र्यांनी मदतीचा हात द्यावा. भविष्यात शहराचा लक्षवेधी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ

शवविच्छेदनासाठी डॉक्टर हवे
गेल्या दीड वर्षापासून अपेक्षित कामे होत नाहीत. यामुळे नगरसेवकांना लोकांची ओरड सहन करावी लागते. नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत नगरपालिका रुग्णालयातून ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज चालावे. शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध व्हावेत. युवराज लोणारी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे
पालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी आहेत. नियोजन आणि नवीन व्हीजन घेऊन कामकाज केल्यास सहा महिन्यांत ही स्थिती सुधारेल. कमी कर्मचार्‍यांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कामकाज चालवले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी धोरणात्मक कार्यक्रमाची आखणी करणे गरजेचे आहे. प्रा. दिनेश राठी, नगरसेवक, खान्देश विकास आघाडी