आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Choudhari 162 Acre Land Recovered, Tahsildar

संतोष चौधरींची 162 एकर जमीन शासनजमा, तहसिलदारांचा आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - माजी आमदार संतोष चौधरी यांनी शेतकरी नसताना खरेदी केलेले 162.52 एकर (65 हेक्टर 77 आर) क्षेत्र शासनाकडे वर्ग करण्याचे आदेश भुसावळच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांनी शुक्रवारी (दि.7) काढले. मुंबई कूळवहिवाट अधिनियम 1948 चे कलम 84 क अन्वये ही कार्यवाही केल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे.
माजी आमदार चौधरी यांनी शेतकरी नसताना जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि विदर्भात शेकडो एकर जमीन खरेदी केली, अशी तक्रार माजी नगरसेवक (कै.) उल्हास पाटील आणि भुसावळ म्युनिसिपल पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण पाटील यांनी दीड वर्षांपूर्वी लोकायुक्त पी. बी. गायकवाड (मुंबई) यांच्याकडे केली होती. या तक्रारीत चौधरी यांच्या नावे असलेल्या जमिनीचे उतारे हे पुरावे म्हणून जोडले होते. याप्रकरणी लोकायुक्त कार्यालयातून चौकशी होऊन तत्काळ कार्यवाहीबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांनी जमीन अधिनियमाप्रमाणे भुसावळच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांना चौकशीअंती कारवाईचे आदेश दिले. यानुषंगाने हिंगे यांनी वर्षभरापासून चौकशी सुरू केली होती. चौकशीचा भाग म्हणून चौधरी यांना तारखेवर हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यांच्या शनिपेठेतील राहत्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली होती. दरम्यान, हिंगे यांनी चौकशी करून शुक्रवारी (दि.7) निकाल दिला. त्यात संतोष छबीलदास चौधरी यांचे नावे झालेले 65 हेक्टर 77 आर जमिनीचे हस्तांतरण मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 84 क अन्वये बेकायदेशीर ठरवत सदरचे क्षेत्र बोजाविरहित शासनाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी तहसीलदार हिंगे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.
गावाचे नाव प्लॉट एकूण क्षेत्र
जोगलखोरी 7 31.5
कुर्‍हे प्र.न. 4 10.65
भुसावळ 2 1.49
मिरगव्हाण 2 3.7
विल्हाळे 1 6.78
खेडी 1 8,53
इतर 3 3.37
क्षेत्र हेक्टरमध्ये
पहिलीच घटना
भुसावळ तालुक्यात शेतकरी नसताना जमीन खरेदी केल्याप्रकरणी लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर ती शासनाकडे जमा होण्याची घटना 25 वर्षांत पहिल्यांदा घडली आहे. माजी आमदार संतोष चौधरींची कोंडी करण्यासाठी यासंदर्भात पडद्याआडून हालचाली झाल्याची कुजबुज होताना दिसते.