आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Santosh Chowdhary Followers Boycott Ncp Meeting, Divya Marathi

संतोष चौधरी सर्मथकांनी उभारली बहिष्काराची गुढी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी, कॉँग्रेस व मित्रपक्षांचा संयुक्त मेळावा झाला. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींना डावलल्याने त्यांच्या सर्मथकांनी अनुपस्थित राहून अघोषित बहिष्काराची गुढी उभारली. पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र, या प्रकाराने संभ्रम निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत संतोष चौधरींचे नाव नसल्याने शनिवारी संध्याकाळपासूनच त्यांच्या सर्मथकांमध्ये नाराजीचा सूर होता. तो त्यांनी रविवारच्या मेळाव्यावर बहिष्कार टाकून व्यक्त केला. नगराध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची नावे पत्रिकेवर असली तरी आपल्याला पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निरोप देण्यात आला नव्हता. म्हणून उपस्थिती देण्याचा प्रश्नच नाही, असे मत त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणून नगराध्यक्षांसह पालिकेतील पक्षाच्या 21 नगरसेवकांसह बाजार समिती, शेतकी संघाचे पदाधिकारी व चौधरी सर्मथक कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मनीष जैन यांचीही अनुपस्थिती जाणवली. ऐनवेळी अध्यक्षस्थान कॉँग्रेसचे माजी आमदार नीळकंठ फालक यांनी भूषवले. पालकमंत्री संजय सावकारे यांनी गल्लीपेक्षा दिल्लीच्या विषयांवर टीका टिप्पणी करण्यात धन्यता मानली. कुपोषण, शिक्षण, विकास आणि नरेंद्र मोदींची कार्यपद्धती या विषयांवर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. माजी आमदार अरुण पाटील, प्रा. डॉ.अस्मिता पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष सलीम खान, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंचायत समितीच्या सभापती मंगला झोपे या मेळावा सुरू झाल्यावर हजर झाल्या. व्यासपीठावर 38 जण उपस्थित असल्याने खुर्ची रिकामी नव्हती. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी त्यांच्या सौभाग्यवती मीना लोणारी यांना इशारा करून खुर्ची देण्याचे सूचित केले. पतीराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी खुर्ची सोडून महिला कार्यकर्त्यांमध्ये बसणे पसंत केले. त्यानंतर आयोजकांना आणखी चार खुच्र्या वाढवाव्या लागल्या हे विशेष.

राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुनील ठाकूर यांनी भाषणात तावातावाने विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे हे भाषण भविष्यात त्रासदायक ठरू शकते, असा विचार करून पालकमंत्री संजय सावकारे यांनी बरोबर 12 वाजून 23 मिनिटांनी लोणारींकडे डोळे वटारले. त्यांना काय म्हणायचे आहे? हे चाणाक्ष लोणारींना कळताच त्यांनी व्यासपीठावर चढून ठाकूर यांना इशारा करून आटोपते घेण्याची सूचना केली.

राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी आपल्या भाषणात ‘लोकसभेचे 2016 चे उमेदवार मनीष जैन’ असा उल्लेख केला. मात्र, व्यासपीठावर खसखस पिकताच त्यांनी क्षमा मागून सोळाव्या लोकसभेचे उमेदवार अशी दुरुस्ती केली. कल्याणेहोळच्या सरपंच तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनीही पाच मिनिटांचे तडाखेबाज भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.