आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींच्या मावळ्यांचा खरा इतिहास लपवला गेला; संतोष महाले, आनंद काशीद यांची खंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतोष महाले व  आनंद काशिद. - Divya Marathi
संतोष महाले व आनंद काशिद.
 जळगाव- छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवाजी महाले, शूर स्वराज्य प्रेमी शिवा काशीद यांच्यासह क्रांतिवीर भाई कोतवाल समाजातील अनेक मावळ्यांचा खरा इतिहास जगासमोर आणला जात नाही. यासाठी सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी पुढे येऊन छत्रपतींचा वारसा पुढे आणण्याची गरज आहे. प्रताप गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाशेजारीच जीवाजी महाले यांचे स्मारक व्हावे, यासाठी सर्व समाजाच्या सामूहिक लढ्याची गरज असल्याची माहिती जीवा महाले यांचे वंशज संतोष ऊर्फ दादा महाले यांनी साेमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
 
नाभिक समाजातील गुणवंतांच्या गौरव सोहळा साेमवारी झाला. या वेळी दादा महाले यांनी ‘दिव्य मराठी’शी दिलखुलास बातचित केली. दादा महाले पुढे म्हणाले की, शिवकाळातील महाले घराण्याचा कालखंड १५६८ ते १८०० पर्यंतचा आहे. सहा पिढ्यांचा हा इतिहास असून शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी राजे, मालोजी राजे, बाबाजी भोसले, देवजी महाले यांनी स्वराज्य निर्माणासाठी अतोनात प्रयत्न केलेत. या सर्वांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान लाभले आहे. त्याकाळी महाले कुटुंबीयांना विविध पदव्या बहाल करण्याबरोबरच काही गड अाणि किल्ले इनाम म्हणून दिल्याचे दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. पावणे चारशे वर्षांनंतरही छत्रपतींचे केवळ नाव घेऊन मुलांसह तरुणांना इतिहास समजणार नाही. स्वराज्य काळात शिवरायांना साथ दिलेल्या मावळ्यांनाही कुठेतरी न्याय मिळावा, यासाठी लढा द्यावा लागत असल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. शिवरायांनी सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यात सर्व समाजांचा वाटा आहे. मात्र, खरा इतिहास पुढे आणला जात नाही. अपूर्ण इतिहासच सांगितला जात असल्याची शोकांतिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 
होता‘जीवा’ म्हणूनच वाचला ‘शिवा’ : होता‘जीवा’ म्हणून वाचला ‘शिवा’ या वाक्यापुरताच जीवा महालेचा इतिहास शिकवला जात आहे. प्रताप गडावर शिवरायांच्या शेजारी जीवा महाले यांचे स्मारक व्हावे, या मागणीसाठी शासकीय समिती नियुक्त करण्यात अाली आहे. मात्र, शासन या कामाविषयी पूर्णपणे उदासीन आहे. ही जागा वनविभागाची असल्याचे दाखवून स्मारकाबाबत टाळाटाळ केली जात आहे. यात राजकीय मंडळीच विनाकारण खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक होत असले, तरी जेथे छत्रपतींचे पाय लागले ते गड-कोट, किल्ले शासनाला दिसत नाहीत. ज्यांनी इतिहास घडवला ते शूरवीर दिसत नाहीत. जीवा महालेंचा इतिहास केवळ दोन ओळीत लिहिण्यासारखा नाही. शिवप्रेमींनी ठरवले तर वस्तुस्थिती मांडून सर्व जाती-धर्मांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास स्मारक उभारणे शक्य आहे. शासन तुमचे, प्रतिनिधी तुमचे, असे असतानाही निर्णय घेण्यास वेळ का? असा प्रश्नही दादा महाले यांनी या वेळी उपस्थित केला.
 
स्मारकासाठी अाणल्या जातात तांत्रिक अडचणी : वीरभाईकोतवाल यांचे पुतणे देविदास कोतवाल यांनीही वीरभाई यांच्या कार्याची माहिती दिली. शासकीय स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सुधीर गवळी यांनीही स्मारकासाठी जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी आणल्या जात असल्याचे सांगितले. याप्रसंगी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिरसाट, कांतीलाल वाघ, मोहन साळवे, जगदीश वाघ, दिनेश महाले, जगन्नाथ वाघ, गणेश नन्नवरे, सुधीर महाले यांची उपस्थिती होती.
 
शिवा काशींदांचे बलिदान व्यर्थ का?
शिवाजीमहाराजांचा दुसरा चेहरा बनून शिवा काशीद यांनी पन्हाळ गडावरून सिद्धी जोहरला सामोरे जात छत्रपतींना सुखरूप गडाबाहेर काढल्याचा इतिहास आहे. मात्र, इतिहासातील नोंदी चुकीच्या आहेत. मावळ्यांचा इतिहास अर्धवट लिहिला जाताे, तो पूर्ण लिहिला पाहिजे. गड, किल्ले ही ठिकाणे जागृत करून पर्यटकांचा ओघ कसा वाढेल, याकडे लक्ष देण्याची गरज अाहे. तसेच धारातीर्थ ठिकाणे विकसित करावे, यासाठी समितीचा लढा सुरू आहे. परंतु, लोकप्रतिनिधींची उदासीनता प्रशासकीय दुर्लक्ष यामुळेच चुकीचा अपूर्ण इतिहास शिकवला जात असल्याची खंत स्वराज्यप्रेमी शिवा काशीद यांचे वंशज आनंद काशीद यांनी व्यक्त केली.
 
बातम्या आणखी आहेत...