आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - सतार छेडल्यानंतर त्यातून निघणारा प्रत्येक स्वर मानवी मनाच्या भावछटांचा मनोरम वेध घेणारा असतो. मऊ, ओलसर अन् कला आस्वादकांच्या काळजात हे स्वर चटकन झिरपतात. म्हणूनच मनोवस्थेतील सारी स्पंदन टिपण्याची जादूगिरी ही सतार वादनातून अनुभवायला मिळते. संगीत मैफलीत आजोबांसोबत सतारवादनाचा जो योग आला तो अलौकिक आहे, अशी भावना अकोला येथील सतारवादक पूर्वा घाटे हीने सोमवारी येथे ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांना र्शद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी भुसावळात अनोखी संगीत मैफल झाली. अखिल भारतीय बहुभाषिक नाट्यपरिषद’ व झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाने या मैफलीचे आयोजन केले होते. पूर्वा घाटे हीने आजोबा मधुकर घाटे यांच्यासोबत ही सतारवादनाची मैफल रंगविली. त्या निमित्ताने सोमवारी पूर्वा घाटे हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की, बालपणापासूनच सतारवादनाचा छंद जोपासला आहे. अकोल्याच्या प्रमिलाताई ओक सभागृहात वयाच्या 16 व्या वर्षी ‘चैत्रपालवी’ संगीत मैफलीत पहिल्यांदा जाहीर स्टेजवर सतार वाजविली. सतारीच्या सुरेल स्वरांच्या मोहीनीने कलारसिक तृप्त झाल्याने त्यांनी सभागृह दणाणून सोडणार्या ज्या टाळ्या वाजविल्या; त्यातून नवचेतना अन् नवी उर्मी संचारण्यास मदत झाली. कौटुंबिक वातावरण संगीताची आराधना करणारे असल्याने ‘कलेचा वेल’ बहरण्यास आपसूक मदतच झाली. आजोबा मधुकर घाटे हे ख्यातकिर्द सतारवादक असल्याने त्यांच्याकडून आपल्याला या अभिजात कलेचे बाळकडू मिळाले. सतार वादनाचा आनंद स्वत:पर्यंत र्मयादित न ठेवता आजोबांचा वारसा पुढे चालवून कलारसिकांची अभिरूची वाढविणे हाच आपला ध्यास आहे. मसितखानी (विलंबित लय) आणि रजाखानी (द्रुतलय) गत आजोंबासोबत वाजविण्याचं सद्भाग्य प्रथमच भुसावळच्या मैफलीत लाभलं आहे. कुटुंबाला संगीताचा वारसा असल्यामुळे प्रत्येकाचं मन हे लय, सूर अन् तालाप्रमाणे जुळले आहे. आजोबांच्या वडिलांनीही सतारवादनाचा छंद जोपासला होता. त्यानंतर आजोबा आणि आता त्यांचा वारसा मी पुढे नेत आहे. ‘घाटे कुटुंबातील सतारवादकांची तिसरी पिढी संगीत साधनेत रममाण झाली आहे’, असं मैफलीनंतर जेव्हा कलारसिक मुक्तकंठाने म्हणतात तेव्हा अभिमान वाटतो अन् मन अगदी भरून येते.
गुरू-शिष्याची मैफल संस्मरणीयच
सतारवादनात अनेक शिष्यांना पारंगत केले. मात्र, नातीचा अपवाद सोडला तर दुसरा कोणीही माझ्यासोबतच्या संगीत मैफलीत सतारवादन करू शकले नाहीत. भुसावळच्या संगीत मैफलीत जेव्हा नातीने सतारीचे सूर छेडले तेव्हा अंतर्मन हे आनंदोत्सवाने उड्या मारतय की काय? असा भास झाला, अशी भावनाही मधुकर घाटे व्यक्त केल्याशिवाय राहात नाहीत. गुरू-शिष्याच्या मैफलीतील कलात्मकता ही संस्मरणीय ठरते.
आजोबांची राग निर्मिती
पूर्वा घाटे हिचे आजोबा मधुकर घाटे हे भौतिकशास्त्राचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. वयाच्या 81 व्या वर्षीही त्यांनी जोपासलेल्या कलेचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही, हे त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधल्यावर लक्षात येते. नंबी केदार, चिराग, पहाडी केदार, शिवशंकरा, र्शीगणेश या पाच रागांची निर्मिती करून त्यांनी ते संगीत मैफलींमध्ये ताकदीने गायीले आहेत. अलीकडेच त्यांनी ‘कोनी बिहाग’ रागाची निर्मिती केली आहे. अकोल्यातील विश्वनाथ महाराजांच्या मठात त्याचे गायन करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.