आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातपुड्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासह इकोटुरिझमला मिळणार वाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - सातपुड्याच्या संवर्धनासह ‘इको टुरिझम’ला वाव मिळावा, यासाठी पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांनी संघटित प्रयत्न सुरू केले आहेत. सातपुडा बचाव कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आलेल्यांपैकी भुसावळच्या उपज संस्थेकडे रावेर तालुक्यातील तिड्या आणि मोहमांडली भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर उपजने रविवारी या गावांची पाहणी केली.

सातपुड्यात होणारी वृक्षतोड, वनजमिनींवर अतिक्रमण थांबवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वारंवार प्रयत्न होतात. वनविभाग, महसूलसह पर्यावरणीय संस्था यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, तरीही सातपुड्याचा होणारा र्‍हास कायम आहे. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले. या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी सातपुडा बचाव कृती समितीने पुढाकार घेतला आहे. सातपुड्याच्या संवर्धनासोबतच आदिवासी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी इको टुरिझमसारख्या प्रकल्पांवर त्यांनी भर दिला आहे.

इको टुरिझमद्वारे अर्थप्राप्ती तसेच चांगल्या आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऊर्जा आणि कृषी सुविधा मिळवून देण्यासाठी ‘सातपुडा विकास अभियान’ सुरू केले आहे. यात सहभागी संस्थांना गावे दत्तक देण्यात आली असून सातपुडा बचाव कृती समितीच्या सहयोगी संघटनांच्या प्रतिनिधिंची नुकतीच मुख्य वनसंरक्षक सुनीता सिंग, उप वनसंरक्षक सुरेंद्र चोपडे, यावलचे पी.जी.राहुरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यातून आता सातपुड्याच्या संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.


बेरोजगारी, पर्यावरण हित साधणार
वनसंपत्ती आणि भूऔष्णिक वीजनिर्मितीसाठी सातपुड्यात अनेक भाग प्रतिकूल आहेत. याबाबत महाऊर्जातर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता इको टुरिझमसाठी प्रयत्न झाल्यास सातपुडा हिरवागार आणि पर्यावरण समृद्ध होईल. येथील आदिवासी बांधवांना हक्काचा रोजगार आणि सुखसोयी मिळाल्यास खर्‍या अर्थाने विकास साधता येईल.


डॉ.प्रमोद पाटील यांची कृतज्ञता
सातपुड्यातील दुर्गम भागात तिड्या आणि मोहमांडली या आदिवासी गावांमध्ये न्हावी येथील डॉ. प्रमोद पाटील गेल्या 40 वर्षांपासून आरोग्य सुविधा पुरवत आहेत. या कार्याबद्दल उपजचे सचिव सुरेंद्र चौधरी, मिलिंद भारंबे, गौरव शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मोहमांडली परिसरातील आर्शमशाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ऊर्जा, पर्यावरण आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती केली.

सर्वेक्षण केले
सातपुड्यातील रावेर तालुक्यातील तिड्या आणि मोहमांडली परिसरातील गावे भुसावळ येथील उपज आणि ग्रीन अर्थ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांना दत्तक दिली असून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या संस्थांच्या सदस्यांनी पहिल्या टप्प्यात इको टुरिझम आणि आदिवासी बांधवांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी सर्वेक्षण केले याला व्यापक रुप मिळेल.


तिड्या,मोहमांडली परिसरात केलेले सर्वेक्षण प्राथमिक टप्प्यातील सुरूवात आहे. आदिवासींच्या उन्नतीमुळेच सातपुड्यातील जैवविविधतेचे संवर्धन करता येईल. सुरेंद्र चौधरी, सचिव, उपज संस्था, भुसावळ