आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुडा अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सातपुड्यातील जैव विविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तसेच यावल अभयारण्याच्या विकासासाठी सातपुडा अध्ययन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. विद्यापीठात येत्या जून महिन्यात या अभ्यास केंद्राची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.
सातपुडा अध्ययन केंद्र सुरू करण्यासाठी लागणा-या अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा करण्यासाठी 23 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सदस्य किशोर रेठे यांची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्रात दिवसभरात खान्देशातील अनेक अभ्यासकांनी सातपुड्यातील जैव विविधतेवरील अभ्यासाचे प्रेझेंटेशन सादर केले होते. चर्चासत्राच्या माध्यमातून सातपुडा अध्ययन केंद्राच्या आवश्यकतेविषयी उहापोह करण्यात आला होता. 23 डिसेंबर रोजी सादर झालेल्या विषयांचा अहवाल तयार केला गेला आहे. हा अहवाल कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
काय असेल अध्ययन केंद्रात? - सातपुडा अध्ययन केंद्रात महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, पर्यावरण क्षेत्रातील संस्था व कार्यकर्ते, संशोधक व अध्यापक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था, माध्यमे आणि विचारवंत यांच्या मदतीने सातपुडा परिसरातील जैव विविधतेचे रक्षण, आदिवासी परंपरांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच माहिती व तथ्य संकलन, सर्वेक्षण, संशोधन, क्षेत्रभेटी, प्रबोधन कार्यशाळा, चर्चासत्र, माहितीची देवाण-घेवाण, पक्षी व वन्यजीव निरीक्षण, वनखात्याशी समन्वय, दृकश्राव्य केंद्र व ग्रंथालये, निसर्ग शिबिरे आदी कार्यक्रम होणार आहेत. गावोगावी चर्चासत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे.
या संस्थांचे सहकार्य - केंद्र उभारण्यासाठी उमवितील स्कूल ऑफ एन्व्हॉयरमेंट अ‍ॅण्ड अर्थ सायन्सेस विभाग, अमरावती येथील सातपुडा फाऊंडेशन, जलश्री, स्कूल ऑफ एन्व्हॉयरमेंट, मुंबई येथील टायगर कंन्झरवेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, खान्देश नेचर कंन्झरवेशन सोसायटी, नंदुरबार येथील सेंटर ऑफ रिसर्च अ‍ॅण्ड स्टॅटेजिक प्लानिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, भुसावळ येथील उपाझ संस्था, शिरपूर येथील प्रियदर्शनी सूतगिरणी, वरणगाव येथील चातक नेचर क्लब, अमळनेर येथील उडान, वन्यजीव संरक्षण संस्था, अमळनेर येथील गरूड झेप, पाचोरा येथील तापी-पूर्णा पर्यावरण संस्था, भारती फाऊंडेशन, अग्निपंख आदींचे सहकार्य मिळत आहे.