आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीसाठी धुळे जिल्ह्यातील 40 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची नोंदच नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्यानुसार या वर्षापासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत होणारा घोळ रोखण्यासाठी ई-स्कॉलरशिप योजनेंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 38 हजार 17 विद्यार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत भरण्यात आले आहेत.
शासनातर्फे पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यानुसार 2011 - 12 या वर्षात या योजनेत अंशत: बदल करण्यात आला. महाविद्यालयात पारंपरिक पद्धतीने अर्ज केल्यावर अनेकदा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे शासनाने शिष्यवृत्तीची प्रणाली ऑनलाइन केली आहे.
287 महाविद्यालयांनी भरले अर्ज - जिल्ह्यातील 327 महाविद्यालयांपैकी 287 महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले. अद्याप 40 महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नोंदणी केलीच नाही. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्या विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले असल्याने सर्व विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
काहींचे अर्ज स्वीकारण्यास नकार - व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणा-या महाविद्यालयांमध्ये अद्याप शिष्यवृत्तीचा घोळ सुरूच आहे. बीसीए, एमसीए, एमसीएम आदी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्यास समाजकल्याण कार्यालयाने नकार दिला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थेचे प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
* शिष्यवृत्तीची ऑनलाइन नोंदणी होत असल्याने कागदांचा घोळ संपला आहे.शिष्यवृत्तीसाठी मिळणारी रक्कम प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने महाविद्यालयांचा हस्तक्षेप कमी होणार आहे. - विलास कर्डक, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक
जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने नोंदणी - यंदा शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात आले. या प्रक्रियेत सुरुवातीच्या कालावधीत एकाचवेळी अर्ज दाखल होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यानंतर मात्र कामात सुसूत्रता आली. आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने इतर मागास वर्गीय प्रवर्गातील 23 हजार 421 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी तर शैक्षणिक शुल्क माफीसाठी 3 हजार 139 विद्यार्थ्यांनी, अनुसूचित जातीच्या 4 हजार 424 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी तर 518 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क माफीसाठी, विशेष मागास प्रवर्गाच्या 957 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी, 112 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क माफीसाठी, विमुक्त जाती आणि भटक्या जातीच्या चार हजार 859 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी तर 586 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क माफीसाठी अर्ज केले आहेत.