आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिकलेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळाली साडेचार लाखांची शिष्यवृत्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - फाइन आर्ट या अभ्यासक्रमांतर्गत मूर्तिकलेचे धडे गिरवणाऱ्या जळगावातील विद्यार्थ्यांने दिल्लीच्या शिव नादर विद्यापीठातून चक्क साडेचार लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अशा प्रकारची शिष्यवृत्ती मिळवणारा तो जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. भगवती रमाकांत सूर्यवंशी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. 
 
भगवती हा शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी रमाकांत सूर्यवंशी यांचा लहान मुलगा आहे. सूर्यवंशी हे बालपणापासूनच धातूपासून मूर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. छंद म्हणून त्यांनी जोपासलेल्या या कलेला मुलाने शैक्षणिक पातळीवर घेऊन जात गेल्या चार वर्षांपासून अभ्यास सुरू केला आहे. जळगावातील भगीरथ स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्याने मूर्तिकलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून फाइन आर्ट (मूर्तिकला) पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीच्या शिव नादर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज केला होता. या अभ्यासक्रमासाठी केवळ १२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यातील एका विद्यार्थ्याच्या दोन्ही वर्षांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पदवी शिक्षणाच्या वेळी सादर केलेली कला, वेगळेपणा, तसेच पुढे कोणत्या प्रकारचे नवीन प्रयोग करणार आहात, याचे प्रेझेंटेशन द्यावे लागते. 

यात १२ विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनमधून भगवती सूर्यवंशी याची निवड झाली आहे. आता पुढील दोन वर्षांसाठी त्याला लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यातून तो जीआरसी जेन स्टाेन या दोन प्रकारांत मूर्तिकला सादर करणार आहे. 

वडील शिल्पगुरू पुरस्काराने सन्मानित 
भगवतीचे वडील रमाकांत सूर्यवंशी यांना पारंपरिक धातू शिल्प या विषयात ‘शिल्पगुरू’ हा पुरस्कार मिळाला आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला होता. भगवतीने देखील पारंपरिक धातू शिल्प या प्रकारात काम केलेले आहे. 

स्वत:च्या २०० डिझाइन 
पदवी पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी भगवती याने म्हैसूर येथे टेराकोटा मातीपासून शिल्प तयार करण्याचे शिक्षण घेतले आहे. या कलेत पारंगत झाल्यानंतर त्याने स्वत:च्या २०० वेगवेगळ्या डिझाइन डेव्हलप केल्या आहेत. त्याचे पेटंट घेण्यासाठी त्याने अर्ज केला आहे. मूर्तिकलेतून वास्तुशास्त्र, सजावटीच्या संदर्भात तो पुढील दोन वर्षे शिक्षण घेणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...