आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship News In Marathi, Scholarship Issue At Jalgaon, Divya Marathi

शिष्यवृत्ती न मिळाल्यास प्राचार्यांवर होणार कारवाई!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- शिष्यवृत्तीच्या अर्जांची माहिती सादर न केल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त वैशाली हिंगे यांनी दिला आहे. दरम्यान, शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

शासनातर्फे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सैनिकी शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतात. त्यानुसार अर्ज भरण्याची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्काविषयक माहिती अद्ययावत करून ती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 2011-12, 2012-13, 2013-14 या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्या विद्यार्थ्यांची माहिती तसेच कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयाला दिलेली नाहीत. परिणामी सलग तीन वर्षांपासून काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. ही माहिती तत्काळ समाजकल्याण कार्यालयात सादर केली नाही व या कारणामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा वैशाली हिंगे यांनी दिला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयांना ही माहिती सादर करावी लागेल.

588 विद्यार्थ्यांची शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी नोंद
6,938 विद्यार्थ्यांची फुले शिष्यवृत्तीसाठी झाली नोंदणी


आतापर्यंत 40 हजार 767 विद्यार्थ्यांची नोंद
शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातून 40 हजार 767 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. त्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील 27 हजार 6, अनुसूचित जाती प्रवर्गातील 6 हजार 615, विशेष मागास प्रवर्गातील 1 हजार 215, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील 5 हजार 861 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नोंदणीचे प्रमाण अधिक असले तरी अद्यापही अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरले नसल्याची माहिती देण्यात आली.

बँका, कॉलेजमुळे विद्यार्थी हैराण
गेल्या दोन वर्षांपासून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होत आहे. बँका व महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकांच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्याचे पैसे दुसर्‍या विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होत असल्याचे अजब प्रकार घडत आहेत. त्यात विद्यार्थी नाहक भरडला जात आहे.