आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळादेखील सरसावल्या, दप्तर वजनदार असल्‍यास पालकांना माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासनाचे सक्तीचे अादेश अन् शिक्षण विभागाच्या तपासणी माेहिमेनंतर मराठी शाळांनी दप्तराचे अाेझे कमी केले अाहे. त्यापाठाेपाठ अाता इंग्रजी शाळांनीदेखील यासाठी स्वत: पुढाकार घेतला अाहे. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांत दप्तरांचे अाेझे किती अाहे, हे तपासण्यासाठी गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या चमूने विविध शाळांना भेट दिली. या वेळी इलेक्ट्राॅनिक काट्यावर दप्तरांचे वजन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्षमतेइतकेच दप्तरांचे ओझे आढळून आले. तसेच बऱ्याच शाळांनी वर्गांमध्ये कपाटे, तासिकांमध्ये बदल, पालकांचे प्रबोधन आदी उपक्रम राबवणे सुरू केले अाहे.

दप्तरांचे ओझे कमी व्हावे यासाठी शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये दप्तरांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तालुकानिहाय क्षेत्रीय अधिकारीही नियुक्त केले आहेत. जिल्ह्यात सुमारे ९३ टक्क्यांपर्यंत शाळांमध्ये दप्तरांचे ओझे शासनाने निर्धारित केलेल्या क्षमतेप्रमाणे असल्याचा दावाही शिक्षण विभागाने केला आहे. मात्र, त्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा सहभाग नव्हता. या माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही दप्तरांच्या ओझ्याबाबत अनेक तक्रारी कायम होत्या. त्यामुळे गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरातील रुस्तमजी, सेंट लॉरेन्स, सेंट टेरेसासह सेंट जोसेफ अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन इलेक्ट्राॅनिक काट्यावर माेजले. त्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडील दप्तरे तुकडीनिहाय वजनाइतकीच असल्याचे आढळून आले.

रुस्तमजी इंटरनॅशनल विद्यालयात सीनियर केजीच्या दाेन ते तीन विद्यार्थ्यांचे दप्तर किलो २०० ग्रॅम ते दीड किलोपर्यंत म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त अाढळून अाले. तथापि, या विद्यालयाने विद्यार्थ्यांची काळजी घेत प्रत्येक वर्गात कपाटे ठेवली असून, त्यात शालेय साहित्य ठेवण्यात येते. यासह डिजिटल बोर्डावरही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात अाहे. तसेच सेंट जोसेफ विद्यालयातही मुलांकडील दप्तरे क्षमतेइतकीच असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलांच्या तासिकांमध्ये बदल करण्यासह चित्रकला काही पुस्तके शाळेतच ठेवली जातात. त्यामुळे मुलांना ते दररोज आणणे अावश्यक राहत नाही. याशिवाय पिण्याचे पाणी असल्याने बाटली शाळेतच भरून दिली जात असल्याने वजन कमी होण्यास मदत होत असल्याचेही शिक्षकांनी सांगितले.

रुस्तमजी स्कूलमध्ये विद्यार्थांची पुस्तके ठेवण्यासाठी कपाट तयार करण्यात अाले अाहे.
रुस्तमजी स्कूलच्या सीनियर केजीच्या वर्गात एका विद्यार्थाच्या दप्तराचे वजन ३.७१ किलाेग्रॅम भरले.

सेंट जोसेफ स्कूलमध्ये दप्तराचे वजन करताना पालक.
सेंट जोसेफ स्कूलमध्ये तयार करण्यात येत असलेली कपाटे.

पालकांचे प्रबाेधन
विद्यार्थ्यांनीविनाकामाची पुस्तके आणू नयेत यासाठी पालकांचे प्रबोधन करण्यात येते. यासह पुस्तकांसह वह्यांचे वजन कमी होईल यादृष्टीने तासिकांमध्ये बदल केले आहेत. काही पुस्तके शाळेतच ठेवता यावीत यासाठी कपाट तयार करण्याचे कामही सुरू आहे. अलकाडिसुझा, प्राचार्य,सेंट जोसेफ

सर्वचशाळांची तपासणी करणार
राज्यशासनाचाहा नियम सर्वच शाळांना लागू आहे. त्यामुळे अनुदानित, विनाअनुदानित अादी सर्वच शाळांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून मोहीम राबवली जाईल. नियमानुसार कार्यवाही करणार अाहाेत. तेजराव गाडेकर, प्राथमिकशिक्षणाधिकारी
बातम्या आणखी आहेत...