आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Bus On Camera At Jalgaon Podar International School Project

कॅमेर्‍याच्या नजरेत स्कूल बस; ‘पोदार’च्या सर्व शाळांच्या बसमध्ये यंत्रणा कार्यान्वित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मुलगा शाळेच्या बसमध्ये बसल्यापासून घरी पोहोचेपर्यंत पालकांच्या मनात धाकधूक असते. पाल्यांना सुरक्षा पुरवून पालकांची चिंता दूर करण्यासाठी पोदार इंटरनॅशनल शाळेने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या निर्णयामुळे शाळेतील प्रशासकीय विभाग आणि पालक मल्टिमीडिया हँडसेटवर बसमधील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवू शकतील. राज्यभरातील सर्व शाळांमध्ये ही सुविधा पुरविण्यात आली आहे. जळगाव शहरातील 8 बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जळगावात पालकांना हालचाली पाहण्याची व्यवस्था कालांतराने करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर बांभोरी गावानजीक असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नर्सरी ते नववीपर्यंत शिक्षण घेत असलेले 650 विद्यार्थी रोज बसने शाळेत येतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात असलेल्या पोदार इंटरनॅशनल ग्रुपच्या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पोदार शाळेव्यतिरिक्त शहरात इतर शाळांच्या 30 पेक्षा जास्त स्कूल बस आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोदार इंटरनॅशनल स्कूलने पहिले पाऊल टाकले असून शहरातील आठ स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे शाळा व्यवस्थापनाला बसमधील सर्व हालचालींची माहिती सहज मिळणार आहे.

मुलांच्या सुरक्षेसाठी
स्कूल बससाठी पालक खर्च करतात. त्या मोबदल्यात त्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मुलांसोबत कोणताही गैरप्रकार होऊ नये, त्यासाठी कॅमेरे बसविले आहेत.
-जितेंद्र कापडे, प्रशासकीय अधिकारी, पोदार स्कूल, जळगाव

> प्रत्येक बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि ऑडिओ रेकॉर्डर.
> एक कॅमेरा चालकाजवळ, तर दुसरा कॅमेरा बसच्या मध्यभागी.
> 60 टीव्हीएल क्षमतेचे हे कॅमेरे आहेत. बसमध्येच डीव्हीआर मशीन बसविण्यात आले आहे
> या मशीनमध्ये एका महिन्याचे फुटेज स्टोअर करता येते. त्याला थ्रीजीचे डॉगल जोडून शाळेतील सर्व्हर रूमला इंटरनेटद्वारे प्रत्येक बस जोडली गेली आहे.
> कॅमेर्‍याचे कनेक्शन थेट बॅटरीमधून असल्याने गाडी बंद असली तरी कॅमेरे सुरू असतील.

काय होईल फायदा
> बसमध्ये लहान मुलांचे मानसिक, शारीरिक शोषण टळणार
> अत्याचार झाल्यास मुलांमध्ये ‘फोबिया’(नैराश्य आजार) निर्माण होतो. ते पालक, शिक्षकांना सांगत नाहीत. गैरकृत्य कॅमेर्‍यात कैद झाल्यास हे प्रकार उघड होतील.
> वर्गात, बसमध्ये मुलांमध्येही अनेकदा काही कारणावरून वाद होतात. शिक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात. या सर्व प्रकारांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे आळा बसेल.

‘दिव्य मराठी’पासून घेतली प्रेरणा
‘दिव्य मराठी’ने औरंगाबाद येथे ‘स्कूल ट्रान्स्पोर्ट सेफ्टी वीक’ उपक्रम राबविला. त्यात पोलिस आयुक्तांनी पालक, संस्थाचालक, वाहन कंत्राटदारांना सूचना केल्या होत्या. ‘हेक्झाटेक सोल्युशन’चे संचालक प्रशांत खंडेलवाल यांनी या उपक्रमाची संकल्पना विविध शाळांसमोर मांडली. विशेष म्हणजे पोदार इंटरनॅशनलच्या प्रशासनाने तत्काळ दाद देत ही सुविधा सुरू केली आहे. यासाठीचा सर्व खर्च शाळा प्रशासन करणार आहे.

पालकांना फुटेजची सुविधा द्यायची की नाही याबाबत शाळेच्या प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. तो झाल्यास प्रत्येक पालकाला त्यांच्या मोबाइलमध्ये गाडीतील लाइव्ह दृश्ये बघता येतील. ‘हेक्झाटेक’ सोल्युशन या औरंगाबादच्या कंपनीने ही सुविधा उपलब्ध केली आहे.