आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा शाळांमध्येही गणवेश घोटाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात गाजलेल्या गणवेश घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या तीन अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. दरम्यान, केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांपुरताच हा घोटाळा र्मयादित नसून, जळगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही गणवेश घोटाळा झाला आहे. सर्वशिक्षा अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून औरंगाबाद येथून गणवेश शिलाई करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी गणवेश वितरणात अनियमितताही झाली असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ र्मयादित यांच्याशी कापड पुरवण्याचा करार केलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यासंदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत. त्यानुसार प्राप्त कापडाची शिलाई स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून किंवा तशी सोय नसल्यास स्थानिक शिंप्यांकडून करून घेण्याचे निर्देश आहेत; मात्र महापालिकेच्या शाळांना गेल्या वर्षी प्राप्त झालेल्या कापडातून विद्यार्थ्यांचे गणवेश स्थानिक पातळीवर न शिवता औरंगाबाद येथून शिवून घेण्यात आलेले आहेत. काही उर्दू शाळांमध्ये तर गणवेशासाठी दिलेले कापड तसेच पडून आहे.
उर्दूचे विद्यार्थी गणवेशाविनाच - शहरात महापालिका शिक्षणमंडळ संचलित उर्दूच्या 13 शाळा आहेत; मात्र त्यातील बहुतांश शाळांतील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी गणवेश मिळालेच नाहीत. कापड उशिरा मिळाला; शिलाईसाठी टेलर मिळेना, अशी विविध कारणे या शाळांच्या मुख्याध्यापकांकडून पुढे करण्यात येत आहेत.
अधिकार्‍यांचेच आदेश - सर्वशिक्षा अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जळगावातील स्थानिक बचत गटांमार्फत गणवेश शिलाई करून घेणे गरजेचे होते; मात्र तसे न करता तत्कालीन प्रशासन अधिकारी एस.आर.भडके यांनी महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांना लेखी पत्र देऊन औरंगाबाद येथून शिलाई करण्याचे आदेश दिले होते.
काय म्हणतात मुख्याध्यापक? मनपाच्या उर्दू शाळा क्रमांक 12मध्ये 22 मुले आणि 155 मुली गणवेशास पात्र आहेत. सर्वशिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झालेले कापड शर्टाचे असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यामुळे कापड बदलवून मिळण्यासाठी संबंधितांना कळवूनही अद्याप नवीन कापड मिळालेले नाही. जमील शेख अली, मुख्याध्यापक

मनपा उर्दू शाळा क्रमांक 49मध्ये गेल्या वर्षी मिळणे अपेक्षित असलेले गणवेशांचे कापड मे महिन्यात प्राप्त झाले. मुस्लिम मुलींचा ड्रेसकोड सलवार, कुर्ती आणि ओढणी असा असल्याने प्राप्त कापडात हे सर्व बसत नव्हते. तसेच 45 रुपयांत शिवून देण्यास अडचणी आल्याने शक्य तसे ड्रेस शिवून वाटू. गुलाब शहा, मुख्याध्यापक
काय म्हणतात अधिकारी - जळगावात 45 रुपये शिलाई घेऊन गणवेश शिवून देण्यास कोणीही तयार नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. औरंगाबाद येथील महिला मंडळ या दरात शिवून देण्यास तयार असल्याचेही इतरांनी सांगितले होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने कार्यवाही करावी, असे सांगितले. एस.आर.भडके, तत्कालीन प्रशासन अधिकारी, मनपा
गणवेश वितरणासंदर्भात अद्याप आपल्यापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. नेमका प्रकार काय आहे, याची माहिती घेऊनच याबाबत बोलणे योग्य होईल. सोमवारी या प्रकरणाची माहिती घेईन. एच.एस.दुसाने, प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ