आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टेट बँकेत भरली शिक्षकांची शाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील खातेदार सरकारी कर्मचार्‍यांचे जून व जुलै महिन्याचे पगार आणि दरमहाच्या पगारातील बचत अडकल्यामुळे बॅँकेच्या सर्वच शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. दरम्यान, बॅँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत होतील, असे सांगून जिल्हा बॅँकेचे कर्मचारी समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी, सहकारी बॅँका आणि पतपेढय़ांचा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या विविध शाखांबाहेर गर्दी होत आहे. दरम्यान, राज्य सरकारी आणि जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी आपले पगार राष्ट्रीयकृत बॅँकेत करण्याची मागणी केल्यामुळे स्टेट बॅँकेसह सर्वच राष्ट्रीयकृत बॅँकांच्या कार्यालयाबाहेर गेल्या दोन-तीन दिवसांपासून गर्दी होत आहे. 15 ऑगस्टपूर्वी या कर्मचार्‍यांना खाते उघडावयाचे आहे.

धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत हजारो जिल्हा परिषद आणि सरकारी कर्मचार्‍यांचे पगार खाते आहे. त्यामुळे बॅँकेच्या ठेवींमध्ये चांगलीच वाढ झाली होती. याशिवाय बॅँक लाइट बिलेही स्वीकारत असल्यामुळे त्या कमिशनमधूनही व्यवस्थापनाच्या खर्चाला हातभार लागत होता; पण जिल्ह्यातील तथाकथित पुढार्‍यांनी विविध संस्थांच्या नावे करोडो रुपयांचे कर्ज काढून बॅँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आणली. त्यामुळे संस्थेचे नुकसान तर झालेच; शिवाय आज बॅँकेतील हजारो कर्मचार्‍यांचे भवितव्यही अंधकारमय झाले आहे. केवळ असुरक्षित कर्जवाटपामुळे बॅँकेचा एनपी वाढून रिझर्व्ह बॅँकेच्या निर्बंधाला बळी पडावे लागले. दोन्ही जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांना पीककर्ज या बॅँकेतून मिळत होते. पीककर्जाच्या भरवशावर शेतकर्‍यांच्या हातातून खरिपाचा हंगामही गेला आहे.
शिक्षकांना सहज कर्ज उपलब्ध - जिल्हा बॅँकेत खाते असूनही सरकारी कर्मचार्‍यांना परवडणार्‍या व्याजदरात गृह आणि कार खरेदीसाठी कर्ज मिळत नसे; पण आता स्टेट बॅँकेतच पगार होणार असल्यामुळे शिक्षकांसह सरकारी कर्मचार्‍यांना गृह आणि कार लोनसाठी परवडणार्‍या दरात कर्ज मिळणे शक्य झाले आहे. स्टेट बॅँकेलाही सुरक्षित कर्ज वितरणाचा लाभ या हजारो कर्मचार्‍यांमुळे होणार आहे.
झीरो बॅलन्सवर खाते उघडले - जिल्हा बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेचे निर्बंध आल्यामुळे ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्यामुळे देणी देताना त्यांना अडचणी येत आहेत. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार पुढील महिन्यातही थकू नये म्हणून स्टेट बॅँकेने शिक्षकांसह सरकारी कर्मचार्‍यांना पगार खाते झीरो बॅलन्सवर उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हजारो कर्मचार्‍यांनी गेल्या आठवड्यात स्टेट बॅँकेच्या वेगवेगळय़ा शाखेत खाते उघडले आहे.
खातेदार शिक्षक काय म्हणतात- शहरातील मोठमोठय़ा सहकारी बॅँका बुडाल्या, ज्या आहेत त्यांची परिस्थितीही खालावलेली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेवरही आमचा विश्वास राहिलेला नाही. एक महिन्याचा पगार उशिरा झाला तरी आम्हाला मुलांचा शैक्षणिक खर्च भागवताना नाकीनऊ येते. याशिवाय घराच्या कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते थकलले आहेत. इतर बॅँकांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी जिल्हा बॅँकेचे धनादेश दिले तर ते स्वीकारत नाहीत. त्यामुळे आम्ही आता स्टेट बॅँकेत खाते उघडत आहोत.
महिनाभरात व्यवहार सुरळीत - जिल्हा बॅँकेची स्थिती आज डबघाईस आलेली असली तरी, महिनाभरात थकीत कर्जाची वसुली आणि राज्य सहकारी बॅँकेने पीककर्जासाठी दिलेल्या निधीतून अनेकांची देणी देणे शक्य होणार आहे. त्यानंतर जिल्हा बॅँकेच्या सर्वच शाखांमधील व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.