आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यास आक्षेप; पालकांची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रिक्षेत आठ विद्यार्थी बसविण्यास पालकांचा आक्षेप नाही. परंतु एका रिक्षेत दहापेक्षा जास्त मुलांना बसविले जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी पालकांनी सेंट जोसेफच्या शाळेबाहेर उभे राहून घेतला. त्यानंतर झालेल्या पालकांच्या बैठकीत आठ विद्यार्थी बसविण्यास हरकत नसल्याचा सूर निघाला.

रिक्षेत किती शाळकरी मुले बसवायची, यावरून खल सुरू आहे. अद्यापपर्यंत सकारात्मक तोडगा निघालेला नाही. तथापि, पोलिस प्रशासनाने नमती भूमिका न घेतल्यास रिक्षाचालकांनी पाच विद्यार्थी नेण्याचे मान्य करीत मुलामागे भाडे दुपटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची बुधवारी शाळेच्या गेटबाहेर असलेल्या साई मंदिराजवळ बैठक झाली. तत्पूर्वी शालेय वाहतूक करणार्‍या वाहनांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेतली. बहुतेक रिक्षांमध्ये दहापेक्षा अधिक विद्यार्थी पालकांना आढळून आले. त्यामुळे एका रिक्षेत आठ विद्यार्थी बसण्यास पालकांची कुठलीही हरकत नाही. पण पाच विद्यार्थी बसविण्याच्या नावाखाली दुप्पट भाडे आकारण्याचा निर्णय पालकांसाठी त्रासदायक असा सूर निघाला.

रविवारी पुन्हा बैठक
इतर शाळांप्रमाणे सेंट जोसेफ संस्थेनेही विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका पालकांनी घेतली. यासंदर्भात संस्थेला निवेदन देऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पोलिस प्रशासन, रिक्षावाले आणि पालकांच्या एकत्रित होणार्‍या बैठकीत काय निर्णय होईल. त्यानंतर पालकांची भूमिका ठरणार आहे. यासाठी येत्या रविवारी सकाळी 9 वाजता बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला प्रा. संजय पाटील, अजय पाटील, वाय.जी. पवार, अनंत पाटील, एन.एम. महाजन यांच्यासह 50 हून अधिक पालक उपस्थित होते.