आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटसंख्येबाबत होणार पुनर्तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बनावट पटसंख्या दाखवून अनुदान लाटणार्‍या शिक्षण संस्थाचालकांवर कारवाई करता यावी, या उद्देशाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई स्थगित झाली होती. कारवाईवरील स्थगिती उठविण्यात आल्याने आता या शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कारवाईपूर्वी संबंधित शाळांच्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करावी आणि गुन्हे दाखल करण्यापूर्वी विधिज्ञांची मदत घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यासह जिल्ह्यात गतवर्षी 3 ते 5 ऑक्टोबरदरम्यान पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत 50 टक्क्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, शिक्षण संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतल्याने कारवाईला स्थगिती मिळाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे संबंधित शाळांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सुधारित आदेशानुसार दोषी शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात निकष बदलण्यात आले आहेत. पटपडताळणीचा विषय अतिशय संवेदनशील झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. दोषी शाळा, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदींचा समावेश असेल.
फेरतपासणी करण्याचे आदेश - जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणार्‍या समितीतर्फे पटपडताळणीच्या मूळ अभिलेखाची फेरतपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात 20 ते 50 व 50 ते 100 टक्के गैरहजेरी असलेल्या शाळांची नावे निश्चित करण्याचे सुचविण्यात आले आहे. माहिती संकलित करताना चूक झाल्यास दुरुस्ती करून पुढील कारवाई केली जाणार आहे. फेरतपासणीनंतर दोषी शाळांवर प्रचलित धोरण व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, फौजदारी गुन्हे दाखल करताना शाळांचा हेतू लक्षात घेणे अपरिहार्य आहे. कारणे दाखवा नोटीस देण्यासह गुन्हे दाखल करताना देण्यात येणारा तक्रारअर्ज विधिज्ञांच्या मदतीने केला जाणार आहे. मूळ अभिलेख स्कॅन करून शिक्षण संचालकांना पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर झालेल्या कारवाईचा अहवाल दर आठवड्याला शिक्षण संचालकांना पाठवावा लागणार आहे. कारवाई करताना शाळांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी देण्यात येणार आहे.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती - 50 टक्क्यांपेक्षा जास्त गैरहजेरी असलेल्या शाळांमध्ये 16 माध्यमिक आणि 58 प्राथमिक शाळांचा समावेश आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या 13, नगरपालिकेच्या 8, खासगी प्राथमिक 21 आणि 16 आर्शमशाळांचा समावेश आहेत. या व्यतिरिक्त 21 ते 51 टक्क्यांदरम्यान हजेरी असलेल्या 123 माध्यमिक शाळा व 267 प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
प्रचलित नियमानुसार कारवाई - ज्या शाळांमध्ये पटपडताळणी दरम्यान 50 टक्क्यांपेक्षा कमी हजेरी होती, अशा शाळांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. त्याचबरोबर दोषी शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर भादंवि कलम 405,420,468,471 व 34 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कारवाईअंतर्गत अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे इतर शाळांमध्ये 100 टक्के समायोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत एखाद्या शाळेत पटावरील संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी आढळले असतील त्या शाळेलाही कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. कोणत्या शाळेविरुद्ध कोणता अधिकारी कारवाई करणार हे जिल्हाधिकार्‍यांची समिती निश्चित करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना यूआयडी क्रमांक देण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
नियोजनासाठी होणार बैठक - राज्य शासनाच्या सुधारित आदेश व नियमावलीनुसार जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित शाळांवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांना सूचना देण्यात येत आहेत. के.के. वळवी, शिक्षणाधिकारी
मनपाच्या शाळांमध्ये पहिलीची पटसंख्या घटली
- खासगी शाळांच्या स्पध्रेत महापालिकेच्या शाळा टिकाव धरत नसल्याची स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्या असून, यावर्षीही विद्यार्थीसंख्येअभावी काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चोवीस शाळांपैकी सहा शाळांमध्ये पहिलीची पटसंख्या दहापेक्षाही कमी आहे. शाळा क्रमांक 61मध्ये एकाही विद्यार्थ्याने पहिलीत प्रवेश घेतलेला नाही.
खासगी शाळांतर्फे विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा ओढा या शाळांकडे अधिक असल्याची स्थिती आहे. त्यामुळे महापालिका किंवा नगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. यावर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षकांनी दारोदार भटकंती केली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरातील 24 शाळांच्या पटसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी उर्दू माध्यमाच्या शाळांची पटसंख्या दोन हजार 340 होती. यंदा ही पटसंख्या दोन हजार 121 आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या 892 होती यंदा ती 827 आहे. सिंधी माध्यमाची पटसंख्या 14 होती त्यात घट होऊन यावर्षी केवळ तीन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या शाळांमध्ये तीन हजार 246 विद्यार्थी होते. यंदा ही संख्या दोन हजार 951 इतकी आहे.
सहा शाळांमधील पटसंख्या चिंतनीय; एका शाळा बंद - महापालिकेच्या शहरात 24 शाळा सुरू आहेत. त्यापैकी शाळा क्रमांक सहामध्ये पहिलीत फक्त दोन विद्यार्थी असून शाळेची पटसंख्या 19 आहे. शाळा क्रमांक नऊमध्ये पहिलीत आठ विद्यार्थी दाखल झाले असून एकूण पटसंख्या 13 आहे. शाळा क्रमांक 40मध्ये सात विद्यार्थी दाखल झाले असून एकूण पटसंख्या 31 आहे.शाळा क्रमांक 52मध्ये दोन विद्यार्थी नव्याने दाखल झाले असून पटसंख्या 30 आहे. शाळा क्रमांक 17मध्ये सहा विद्यार्थी नव्याने दाखल झाले असून पटसंख्या 70 आहे. शाळा क्रमांक 61मध्ये एकही विद्यार्थी नव्याने दाखल झाला नाही. या शाळेत फक्त तीन विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची स्थिती आहे.
अंगणवाड्यांमुळे दिलासा - महापालिका शिक्षण मंडळातर्फे चार अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येत आहे. या चारही अंगणवाड्यांमध्ये तब्बल 720 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. महापालिका शिक्षण मंडळतर्फे प्रथमच इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या वर्गांना मिळणार्‍या प्रतिसादावर आगामी काळात पुढील वर्ग वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षण मंडळातर्फे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत; परंतु या उपक्रमांना शहरातून किती प्रतिसाद मिळतो यावर महापालिकेच्या शाळांचे भवितव्य अवलंबून असेल.