आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील छडी झाली गूल; विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याच्या पद्धतीही बदलल्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ हे गाणे पूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना तोंडपाठ असायचे. कारण त्यांना त्या छडीचा चांगलाच धाक असे. विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही अथवा काही खोडी केली तर शिक्षकांकडून या छडीचा प्रसाद विद्यार्थ्यांना मिळत असे; परंतु आता बदलत्या शिक्षणाप्रमाणे शिक्षेच्या संकल्पनाही बदलत ही छडी हद्दपार झाल्याचे चित्र आहे. याशिवाय हातावर छड्या मारणे, डस्टर फेकून मारणे, पायाचे अंगठे धरून उभे करणे, बेंचवर हात वर करून उभे करणे, शाळेच्या मैदानाला धावत फे-या मारायला लावणे, अशा शिक्षांचे प्रमाणही जवळजवळ संपले आहे. या शिक्षेमुळे अनेकवेळा विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होण्याचे प्रकार घडत असत. त्यातून मोठे वादही झाले आहेत. मात्र आता अशा शारीरिक शिक्षेचे स्वरूप शाळांनी बदलले आहे. शहरातील शाळांचा आढावा घेतल्यास हे दिसून आले.
शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षा करताना शिक्षकांकडून बहुतेक वेळा छडीचा वापर केला जाई. घरचा अभ्यास केला नाही तर घे हातावर छड्या असे म्हणणारे मास्तर वा बाई हमखास प्रत्येक शाळेत असत. मात्र आता अशा छडी घेऊन फिरणा-या मास्तरांची संख्या नगण्य झाली आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक इजा होईल, अशी शिक्षा केली जात नाही. त्याऐवजी दिलेला गृहपाठ पुन्हा लिहावा, पीटीच्या तासाला वर्गात बसून अभ्यास करायला लावणे, पालकांना पत्र देऊन मुलांची खोडी कळवणे अशा मार्गांचा अवलंब अनेक शाळांकडून होत आहे.
* मुलांना शिक्षकांनी शिक्षा करणे यात गैर काहीही नाही. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतला तो महत्त्वाचा भाग आहे; परंतु शाळेत होणा-या शिक्षेमुळे मुलांना गंभीर इजा होईल, अशा पद्धतीने मारहाण करणे अथवा मैदानात पळायला लावणे हे चुकीचे आहे. पूर्वी अशा शिक्षा होत; परंतु आता शाळाही याबाबत खबरदारी घेताना दिसून येतात. याबाबत पूर्वीही अनेक प्रकरणे झालेली आहेत. पालकांनीही या मारहाणीविरोधात ओरड केलेली आहे. - विलास शंकर जोगी, पालक
स्वअभ्यासावर अधिक भर - घरचा अभ्यास देण्यापेक्षा स्वअभ्यासावर अनेक शाळांमध्ये भर दिला आहे. काही शाळांमध्ये स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे सोडवण्यास सांगितले जाते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त मिळणा-या स्वाध्यायमालेचा वापर करण्यास लावण्यावर अधिक भर दिला जात आहे.
विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणेअपराध - शासनानेही विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास मनाई केली आहे. शिक्षकांच्या मारहाणीत शारीरिक अपाय संभवतील अशा कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्यास कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. शहरात अशा प्रकारे शिक्षा झाल्याने काही वादाचे प्रकारही घडले आहेत. त्यातून विद्यार्थी संघटनांनी आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा करू नये, असे निर्देशच शिक्षकवर्गाला दिले आहेत. पुर्वी अनेक वेळेला शिक्षकांनी बेभानपणे केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांना गंभीर इजा तसेच विद्यार्थी बेशुध्द झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर हातात असेल ती वस्तू फेकून मारणे. कोवळया मुलांवर चुकीच्या मानसिकतेतून केलेली मारहाण या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकाला चिंतीत व्हायला लावले आहे.