आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षांत कोंबून बसणार्‍या विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरात जून महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचा अपघात झाला होता. त्यानंतर विद्यार्थी वाहतुकीच्या प्रश्नावर रान पेटले. मात्र, त्यानंतर आता पुन्हा शहरात रिक्षांमध्ये विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक सुरू झाली आहे. त्याकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन शाखेने पूर्णत: दुर्लक्ष केल्याची स्थिती आहे.

शहरात जून महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षेला ट्रकने धडक दिल्याने खूश जैन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याबाबत तातडीने सर्व विभागाच्या बैठका झाल्या. त्यानंतर काही दिवस नियमांची अंमलबजावणी झाली. त्यानंतर प्रशासनासह पालकांनाही वाहतुकीच्या नियमांचा विसर पडला आहे. त्यामुळे असुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. काही रिक्षाचालक विद्यार्थ्यांना गुरांसारखे रिक्षामध्ये कोंबून त्यांची वाहतूक करत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आगामी कालावधीत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जून महिन्यात विद्यार्थी वाहतुकीची भाडेवाढ करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही विद्यार्थी संख्या कमी झालेली नाही. त्यावर पालक अथवा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आक्षेप घेण्यात येत नाही. शाळांमध्ये असलेल्या परिवहन समित्यांनीही जबाबदारी झटकल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा वार्‍यावर आलेले आहेत.

सहा विद्यार्थ्यांची आहे परवानगी
परिवहन विभागाने रिक्षात फक्त सहा विद्यार्थी बसवण्याची परवानगी दिलेली आहे. असे असताना नियम धाब्यावर बसवून कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. तसेच रिक्षाच्या पाठीमागे ‘विद्यार्थी वाहतूक’ असे लिहिणे बंधनकारक आहे. रिक्षाच्या दोन्ही बाजूला जाळी बसवणे, रिक्षाची कागदपत्रे योग्य असणे तसेच पुढील सीटवर विद्यार्थ्यांना बसवण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे ; परंतु रिक्षाचालक नियम डावलून विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. एका रिक्षात किमान दहा ते बारा विद्यार्थी बसवण्यात येत आहेत. पूर्वीपेक्षा विद्यार्थ्यांच्या भाड्यात पन्नास ते शंभर रुपयांनी वाढ केलेली असताना बेजबाबदारपणे वाहतूक होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शहर वाहतूक पोलिस मस्त, ‘आरटीओ’विभाग सुस्त
शहरात जून महिन्यानंतर असुरक्षित असलेल्या चौकांमध्ये जादा शहर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, संबंधित पोलिस कर्मचारी विद्यार्थी वाहतूक अथवा वाहतुकीला येणारे अडथळा दूर न करता अन्य कामात व्यग्र असतात. विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात पोलिस कमालीचे बेफिकीर आहेत. नियम डावलून विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांविरुद्ध पोलिस अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पालकांमध्ये बजेटचा विचार होत असल्यामुळे रिक्षाचालकांना विरोध केला जात नाही. गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसला खासगी बसने धडक दिली होती. शहरात विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे विविध शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या, शिक्षण विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखेतर्फे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आता पुन्हा जनजागृती करणार
रस्ता सुरक्षा सप्ताहाला 3 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेषत: विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. त्याअंतर्गत पालकांची सभा, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, रिक्षाचालकांची बैठक घेण्यात येणार आहे. जेणेकरून आगामी कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.