आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिळखिळ्या, नादुरुस्त स्कूल बस, रिक्षांतून विद्यार्थी वाहतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ठरवून दिलेल्या निकषापेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनात पुरेशा सुविधांचा अभाव असून, या वाहनांतील साधनांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भीती वाढली अाहे. शहरातील एका स्कूल बसमधील रेडिएटरच्या गरम पाण्यामुळे शालेय विद्यार्थी भाजल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या वाहनांची तपासणी करण्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने वाहनचालकांची मनमानी वाढली आहे.
शहरात दररोज १५० च्या वर विविध शाळांच्या बसेस वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी घेऊन धावतात. यात टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस, टाटा मॅजिक, व्हॅन, रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने यातील स्कूल बसेसची पाहणी केली असता, त्यात अनेक बसेसमध्ये विविध सुविधांचा अभाव दिसून आला. बसेसमधील आसन तुटलेले आणि गंज लागलेल्या स्थितीत होते. तसेच अनेक वाहनांत टायर, रेडिएटर, लाइट्सच्या वायरी उघड्यावरच दिसून आल्या. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची भीती वाढली आहे. अनेक वाहनचालक पुढच्या सीटवर अधिक विद्यार्थी बसवत असल्याने मुलांना आणि वाहनचालकालाही वाहन चालवताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे अपघाताची भीतीही मनात कायम असते. शालेय व्यवस्थापन समिती, पालक याबाबत मात्र हे सर्व पाहूनही याविरुद्ध बोलण्यास धजावत नाहीत.

या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांत निश्चित मर्यादेपर्यंतच विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देण्यात येते. मात्र, वाहनचालक यापेक्षाही अधिक विद्यार्थी वाहनात कोंबून मुलांची वाहतूक करतात. पालकही मुलांना रिक्षावाले काकांच्या हवाली करून निर्धास्त होतात. मात्र, हे रिक्षावाले काका आपल्या वाहनांची योग्य देखभाल दुरुस्ती करीत नसल्याने या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षावाले काकांवर कोणत्या विश्वासावर मुले सोडावीत, असा प्रश्नही निर्माण होत आहे.

नियमबाह्य वाहनांचाही वापर
प्रत्येक विद्यार्थ्याचे घरापासून शाळेपर्यंतचे अंतर हे साधारण ते किलोमीटरपर्यंत अाहे. त्यामुळे यात विद्यार्थ्याचा प्रवास हा अर्धा ते पाऊण तासापर्यंतचा असतो. मात्र, या प्रवासातही वाहनांमधील तांत्रिकबाबींकडे इंजिनासह विविध साधनांच्या दुरुस्तीकडे वाहनचालक दुर्लक्ष करतात. वाहनांची गियर, ब्रेक, इंजिन, रेडिएटर, लाइट्स, हॉर्न यांची नियमित दुरुस्ती देखभाल केली जात नसल्याने ही वाहने धोकेदायक ठरत आहेत. शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून टाटा मॅजिक, टेम्पो ट्रॅव्हलर तसेच रिक्षांना परवानगी देण्यात येते. मात्र, अन्य ओमनी, जीप या सारख्या वाहनांचाही वापर शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्रास सुरू आहे.

पालकांकडून होत नाही विरोध
शहराच्याते किलोमीटरच्या परिघात शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी अंतरानुसार प्रतिविद्यार्थ्यास ६०० ते हजार रुपयांपर्यंतचे भाडे वाहनचालक घेतात. मात्र, त्या तुलनेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या अल्प आहेत. मोटार वाहतूक अधिनियम कायद्यानुसार वाहनाच्या आसनक्षमते इतकेच विद्यार्थी नेणे अपेक्षित असताना वाहनचालक पैशांच्या लालसेपोटी दुपटीने विद्यार्थी वाहतूक करतात. पालकांकडून पुरेपूर मोबदला घेतला जात असताना, या वाहनांची निगा ठेवण्यात मात्र कुचराई केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घराजवळ आलेल्या वाहनात कोंबून बसलेला आपला पाल्य शाळेतून घरी सुरक्षित येईपर्यंत पालकांच्या मनात भीती असते. मात्र, पालकांकडूनही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्याला विरोध केला जात नाही.