आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, तालुक्यातील सात पैकी तीन शाळांमधील स्वच्छतागृहांची कामे नियोजनाअभावी पाच महिन्यांपासून रखडली आहेत. या मुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने कामे पूर्ण करण्यासाठी विविध पातळीवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार शाळांमध्ये मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. यानुसार बांधकामाच्या वार्षिक कार्य योजनेच्या अंदाजपत्रकास राज्यस्तरावरील कार्यकारी समिती व केंद्र शासनाच्या प्रकल्प मंडळाने मान्यता दिली आहे. यानंतर पुढील वर्षात नियोजित बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने शासनाने विविध पातळीवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या मुळे कामांना वेग मिळू शकतो.
यानुसार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त महापालिका, कार्यकारी अभियंता, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लेखा लिपिक, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करण्यात आली. या सर्वांनी बांधकामाचा शासनास अहवाल सादर करणे आवश्यक आहे. तसेच सुरू न झालेल्या आणि प्रलंबित बांधकामाबाबत शाळा व्यवस्थापन समिती व विकास समितीस कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
कन्हाळेत आहे सर्वकाही आलबेल
सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या 10 पैकी टहाकळी येथील आठ शाळाखोल्यांचे काम मंदगतीने सुरू आहे. तर कन्हाळे येथील उर्दू शाळेतील पटसंख्या कमी असल्याने शाळा खोलीचे कामच सुरू झालेले नाही. या मुळे सर्व शिक्षा अभियानातील कामांवर शासनाने टाच आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पदाधिकारी म्हणतात कामे पूर्ण करू
टहाकळी येथील आठ शाळा खोल्यांचे बांधकाम आठ दिवसांमध्ये पूर्ण करू. या कामासाठी 75 टक्केनिधी देण्यात आला आहे. तर उर्वरित ठिकाणी जागेचा वाद असल्याने कामे अपूर्ण आहेत.
-अविनाश येवले, बांधकाम अभियंता, पंचायत समिती, भुसावळ
खडकाळ जागा असल्याने खोदकामास विलंब झाला. सध्या काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल. पालकमंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येईल.
-सुनील पाटील, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, टहाकळी
गट साधन केंद्रामधून शाळा खोल्या आणि स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी निधी वर्ग केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले आहे. या अडचणी सोडवून ते पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करण्यात येईल.
-पी.एन.ठाकरे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी, भुसावळ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.