आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळातील दुय्यम कारागृह आस्थापनेचा प्रस्ताव पाठवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळ येथील दुय्यम कारागृह सुरू होऊन सहा वर्षे झाली. मात्र, येथे अद्यापही स्वतंत्र आस्थापना नसल्याने कायमस्वरूपी तुरुंगाधिकारी नाहीत. कायमस्वरूपी आस्थापनेसाठी जळगाव येथील तुरुंगाधिकारी बी.श्रीराव यांनी कारागृह उपमहानिरीक्षक (औरंगाबाद) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे.

भुसावळ येथील तहसील कार्यालयाच्या मागे दुय्यम कारागृह आहे. 60 कैदी क्षमतेच्या या कारागृहात 10 ते 15 दिवसांसाठी कैदी ठेवले जातात. कारागृह परिसरात सात खोल्या असून एका खोलीत जास्तीत जास्त पाच कैदी ठेवता येतात. दरम्यान, कारागृहात कैद्यांसाठी स्वतंत्र बॅरेक आवश्यक असते. भुसावळात मात्र स्वतंत्र कोठडी आहे. यामुळे कैदी संख्या वाढली तर त्यांना जळगाव येथे रवाना केले जाते. दुय्यम कारागृहाचा कारभार पाहण्यासाठी एक तुरुंगाधिकारी, 9 कर्मचारी आणि एक लिपिक असे कर्मचारी आहेत. दरम्यान, न्यायालयीन कोठडीतील आरोपी घरून जेवणाचा डबा मागवू शकतात. फरसाण, फळे, कपडे, साबण, पेस्ट, वृत्तपत्र स्वखर्चाने मागवता येते. तसेच कैद्यांना कारागृहात जास्तीत जास्त एक हजार रुपये सोबत आणता येतात. खर्च भागवण्यासाठी आणलेली ही रक्कम त्यांना तुरुंगाधिकार्‍याकडे जमा करावी लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच सकाळी उठल्यानंतर कैद्यांना चहा, नाश्ता मिळतो. जेवणात केळीचा समावेश बंधनकारक आहे. दुपारी चहा आणि रात्रीचे जेवण असा नित्यक्रम आहे.

आस्थापना गरजेची
भविष्यात भुसावळात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू होणार आहे. विभागातील पाच तालुक्यांचे कामकाज या न्यायालयातून चालणार आहे. या पार्श्वभूमीवर दुय्यम कारागृहात ठेवल्या जाणार्‍या कैद्यांची आणि न्यायालयीन कोठडीतील आरोपींची संख्या वाढू शकते. यामुळे कारागृहात कायमस्वरूपी आस्थापना गरजेची आहे.

>भुसावळ दुय्यम कारागृह आस्थापनेचा प्रस्ताव उपमहानिरीक्षकांकडे पाठवला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच येथील अधिकारी आणि कर्मचारी संख्या ठरेल. प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा आहे.
- बी. श्रीराव, मुख्य तुरूंगाधिकारी, जळगाव

आवारात बगीचा
दुय्यम कारागृहात सात खोल्या असून एका खोलीत अधीक्षक कार्यालय आहे. उर्वरित खोल्यांमध्ये आरोपींना ठेवले जाते. 60 कैदी क्षमतेच्या या कारागृहात सध्या 18 कैदी आहेत. कारागृहात सुंदर बगीचा विकसित केलेला असला तरी कैद्यांच्या खोलीत पुरेसा प्रकाश येत नाही. यामुळे नवीन इमारत गरजेची आहे.