आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : पहारेकऱ्याला बेदम मारहाण करून लूट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मुंबई-आग्रा महामार्गाला लागून असलेल्या ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाचे राखणदार सुकदेव वानखेडे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना मारहाण करून चौघांनी एक लाख ६५ हजारांचे साहित्य लांबवले. तत्पूर्वी वानखेडे यांना बांधण्यात आले होते. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शहरापासून जवळ असलेल्या अवधान शिवारात ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गोदाम आहे. या ठिकाणी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चार लुटारू आले.
पहारेकरी सुकदेव वानखेडे (६०, रा. सीताराम माळी यांची चाळ, चितोड रोड, धुळे) यांना त्यांची चाहूल लागली. त्यानंतर लुटारूंनी त्यांच्या डोळयात मिरचीची पूड फेकली. तसेच लाकडी दांड्याने त्यांच्या दोन्ही पायांच्या गुडघ्याखाली वार केले. शिवाय त्यांना खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर गोदामाचे शटर उचकावून चौघे आत शिरले. गोदामातील माल बाहेर आवारात उभ्या असलेल्या मिनीट्रक (एम.एच.१८/एम.७७५५) मध्ये भरून चौघे पसार झाले. चोरट्यांनी चार संगणक, प्रिंटर, कपड्याचे गठ्ठे इतर साहित्य लांबवले. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर वानखेडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक हिंमत जाधव, मोहाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी विकास थोरात, उपनिरीक्षक युनूस शेख, अशोक रामराजे, नरेंद्र कुलकर्णी, प्रभाकर बैसाणे, प्रशांत चौधरी आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राजेशकुमार वर्मा यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना सेम टू सेम
गेल्यावर्षी याच परिसरात गोदामातील राखणदाराला मारहाण केल्यानंतर खाटेवर बांधून ठेवण्यात आले होते. अंथरुणाखाली गुदमरून त्या राखणदाराचा मृत्यू झाला होता. त्या वेळीही चार जणांनी अशाच पद्धतीने सुमारे तीन लाखांचा माल लुटून नेला होता.

निवारा भोवला
वानखेडेशेजारी असलेल्या गोदामात कार्यरत आहेत. पाऊस येईल असे वाटल्याने ते टीसीआयच्या गोदामाजवळ आले होते. लुटारूंना हा प्रकार माहीत नव्हता, असे दिसून आले.

उशिरापर्यंत तपास सुरू
याघटनेनंतर मोहाडी पोलिसांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली आहे. काही सराईत गुन्हेगारांकडे चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय लागलीच एक पथक तपासासाठी रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.