आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security Tension Increases After Suresh Jain Comes In Jalgaon

आमदार जैन आल्यामुळे कारागृहात सुरक्षेचा ताण वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी आमदार सुरेश जैन हे येथील कारागृहात दाखल झाल्यामुळे आता सुरक्षेबाबतचा तणाव वाढणार आहे. स्थानिक आमदार असल्यामुळे जैन यांना भेटणार्‍या मंडळींची संख्या वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी अधीक्षकांनी संबंधित पत्रव्यवहार केला आहे. दुसरीकडे क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी झाल्यामुळे कारागृह पूर्णपणे फुल्ल झाले आहे.

कारागृहात सध्या 400हून अधिक कैदी आहेत. त्यात 10हून अधिक कैदी शिक्षा जाहीर झालेले आहेत. 180 कैदी सामावले जातील एवढीच या कारागृहाची क्षमता आहे; मात्र क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी सध्या या कारागृहात आहेत. त्याचबरोबर गार्ड्सची संख्याही अत्यंत कमी आहे. कारागृहाच्या नियमानुसार सहा कैदी मिळून एक रक्षक, तर सहा-सहा कैद्यांचे 5 चमू मिळून एक हवालदार अपेक्षित असतो. जळगाव कारागृहाचा विचार केला असता, 70 रक्षक तर 11 हवालदार अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात मात्र हवालदार आणि सुरक्षारक्षक (गार्ड) असे एकूण केवळ 35 कर्मचारी कारागृहात आहेत. त्यामुळे सर्वांचाच ताण वाढला आहे. दरम्यान, मंगळवारपासून कारागृहाबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली.


वरिष्ठांशी पत्रव्यवहार
क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्यामुळे कारागृह फुल्ल झाले आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच गार्ड्सची संख्याही कमी असल्याचे दैनंदिन कामातून निदर्शनास येत आहे. - डी.टी.डाबेराव, कारागृह अधीक्षक

न्यायालयात नेण्यास अडचणी
गार्ड्सची संख्या कमी असल्यामुळे अनेक कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आवश्यकतेचे निकष पडताळूनच कैद्यांना न्यायालयात पाठवले जात आहे.

अधीक्षकांनी पाठवले पत्र
अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी कारागृहातील समस्यांबाबत कारागृह महानिरीक्षकांना पत्र पाठवले आहे; मात्र या पत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. विशेष म्हणजे, कारागृहाच्या कैदी क्षमतेत वाढ किंवा स्थलांतर हा या पत्रातील प्रमुख मुद्दा आहे.