आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रेत्यांकडून डेली वसुली करणार्‍यांविरुद्ध करा तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -राष्ट्रीय फेरवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हॉकर्सकडून मासिक फी आकारणी करण्यात येत आहे. मात्र, नोंदणी न केलेल्या शहरातील सुमारे पाचशेच्या वर हॉकर्सकडून 10 रुपये वसुली करणारी दुसरीच यंत्रणा कार्यरत झाल्याकडे ‘दिव्य मराठी’ ने लक्ष वेधले होते. या माध्यमातून जमा होणारा प्रचंड पैसा पालिकेच्या तिजोरीत न जाता परस्पर गिळंकृत केला जात असल्याकडे लक्ष वेधताच प्रशासनाने अशा पद्धतीने 10 रुपये मागणार्‍यांची पालिकेत तक्रार करण्याचे पत्रकच काढले आहे.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील हॉकर्सची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्याकडून दरमहा 300 रुपये फी आकारणी केली जाते. या माध्यमातून प्रशासनाच्या तिजोरीत दरमहा सुमारे आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र, अजूनही शहरातील सुमारे 500 च्यावर विक्रेत्यांनी नोंदणीच केलेली नसून अशांची तपासणी सुरू झाली आहे. शनिवारी बळीरामपेठ परिसरात भाजीपाला तसेच फळे विक्री करणार्‍या फेरीवाल्यांची मासिक फी आकारणीच्या पावती तपासणी करण्यात आली. ज्यांनी पावती फाडलेली नव्हती. त्यांचे तराजू काटे व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या तपासणीत 70 फेरीवाल्यांनी 300 रुपये फी भरणा केली. ही तपासणी मोहीम सुरूच राहणार असून ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांच्याकडून नोंदणी करवून घेतली जात आहे. दरम्यान अतिक्रमण विभागाने डेली वसुली बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
केवळ येथेच लागणार 10 रुपये फी
खंडेरावनगर परिसरात मंगळवारी, पिंप्राळ्यात बुधवारी आणि लक्ष्मीनगर भागात शनिवारी आठवडे बाजार भरतो. केवळ याच विक्रेत्यांकडून 10 रुपये वसुली करण्यात येणार आहे. मात्र, याची पावती घेतल्यावरच डेली फी देण्यात यावी. पावती आढळून न येणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई होणार असल्याचेही अतिक्रमण विभागाच्या अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.