आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधनाचे ७०० प्रस्ताव धूळखात; दोन वर्षांनंतर समिती केली स्थापन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - ज्येष्ठ कलावंतांना शासनातर्फे दरमहा मानधन दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल होणारे प्रस्ताव मंजुरीचा अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असतो; परंतु जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही समितीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सुमारे सातशे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडून आहेत. हा प्रकार लक्षात आल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीची लवकरच बैठक होईल. बैठकीत मानधनासाठी पात्र असणाऱ्या कलावंतांची मुलाखतीनंतर निवड होणार आहे. 
 
आयुष्यभर कला क्षेत्राची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना उतारवयात सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे ज्येष्ठ कलावंतांना मानधन देण्यात येते. या याेजनेंतर्गत स्थानिक वर्ग कलावंतांना दरमहा एक हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ कलावंतांना प्रस्ताव दाखल करावे लागतात. हे प्रस्ताव मंजुरीचा अधिकार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असतो परंतू दोन वर्षांपासून ही समितीच अस्तित्वात आली नव्हती. त्यामुळे मानधनासाठी प्राप्त झालेले सातशे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे धूळखात पडून आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कलावंतांनी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर आता पालकमंत्री दादा भुसे यांनी या समितीची स्थापना केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मराठी अहिराणी चित्रपट कलावंत सुभाष शिंदे यांची निवड केली आहे. समितीत अन्य सात जणांचा समावेश आहे. या समितीची लवकरच बैठक होईल. त्यानंतर प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात येईल. ही प्रक्रिया झाल्यावर मुलाखतीस पात्र असलेल्या कलावंतांना पत्र पाठवून बोलावण्यात येईल. 

कलावंतांना देणार न्याय 
^ज्येष्ठ कलावंतांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी बैठक घेण्यात येऊन पात्र कलावंतांना मानधन देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. मानधनापासून वंचित कलावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न असेल. -सुभाषशिंदे, अध्यक्ष,ज्येष्ठ कलावंत निवड समिती
 
सखोल पडताळणी होणार 
चांगल्या कलावंतांना मानधन मिळावे यासाठी समितीतर्फे प्रयत्न होणार आहेत. मानधनासाठी कलावंतांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीवेळी कलावंतांना कला सादर करावी लागेल. 

मानधन सरळ खात्यावर होते वर्ग 
ज्येष्ठ कलावंतांना देण्यात येणारे मानधन पूर्वी समाजकल्याण विभागातर्फे दिले जात होते. मात्र, आता कला संचालनालयाकडून थेट कलावंतांच्या बँक खात्यावर मानधन वर्ग करण्यात येणार आहे. समिती गठीत झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात दाखल होणाऱ्या प्रस्तावांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता या समितीची तातडीने बैठक घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...