आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व ही अवघड कला;चांगले बोलणारा हमखास यशस्वी होतो, द.मा.मिरासदार यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वक्तृत्वकला वास्तविक सोपी वाटत असली तरी ती खूप अवघड आहे. ही कला लेखनापेक्षा श्रेष्ठ असून नेहमी चांगली बोलणारी व्यक्ती हमखास यशस्वी ठरते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हा गुण आत्मसात करायला हवा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांनी व्यक्त केले.

प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनात आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी साहित्याबाबतच्या अनेक पैलूंना उजाळा दिला. वास्तविक या कार्यक्रमात कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार होती. परंतु ते उपस्थित राहू न शकल्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांची नितीन केळकर यांनी मुलाखत घेतली. केळकर यांनी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून मिरासदार यांच्यातील विनोदी साहित्यिक विद्यार्थ्यांसमोर उलगडला. मिरासदार यांनी त्यांच्या जीवनातील अनेक विनोदी किस्से विद्यार्थी साहित्यिकांना ऐकवले. त्यांच्या विनोदी भाषणशैलीमुळे अवघा सभागृह हास्यकारंजात बुडाला होता. या वेळी मिरासदार यांनी सांगितले की, मी माझ्या जीवनातील विनोदी प्रसंगातून साहित्याची निर्मिती केली. विनोदी लेखक होण्यासाठी पंढरपूर येथील वास्तव्य कारणीभूत ठरले. पंढरपूर म्हणजे त्या वेळचे मोठे खेडेच. तेथे निवांतपणा असायचा. कोणत्याही व्यक्तीला कसे काय, हा प्रश्न विचारला की त्यावर त्यांचे उत्तर असायचे ‘निवांत’. वडिलांसह मामा, काका, आजोबा सर्वच व्यवसायाने वकील असल्यामुळे आमचे घर जणू ‘वकिलांचेच घर’ होते. असे असले तरी मला कधी वकिली करावीशी वाटली नाही. वडिलांनीही वकिली न करण्याचा सल्ला दिला. लेखनाची आवड असल्याने मी पत्रकारितेचे क्षेत्र निवडले आणि पुण्यात तीन वर्षे पत्रकारिता केली. त्यानंतर पंढरपुरात प्राध्यापक म्हणून काम करत असताना साहित्य लेखन करीत राहिलो.

‘चिंविं’चे विनोद नारदाच्या कळीप्रमाणे....
चिंतामण जोशी, आचार्य अत्रे यांच्या विनोदाची जातच वेगळी होती. चिंतामण जोशी यांचा विनोद कुणालाही न दुखावणारा आणि निखळ हसवणारा असायचा. पुराणातील नारदाच्या कळीप्रमाणे त्यांचे विनोद असायचे. नेमके तसेच विनोद ‘चिविं’चे देखील असायचे. रामायणातील कथांवरही त्यांनी खूप विनोदी पुस्तके लिहिली आहेत. मात्र, वक्तृत्वगुणाच्या अभावामुळे त्यांचे विनोदी लिखाण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले नाही, अशी खंतही मिरासदार यांनी व्यक्तकेली.

आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश
मिरासदार यांनी आचार्य अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही या वेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, अत्र्यांच्या रागासमोर कोणाचीच गय व्हायची नाही. जो समोर येईल त्याच्यावर टीकास्त्र सोडण्यास आचार्य अत्रे कधीही घाबरले नाहीत. त्यांचे विनोदही खोचक होते. चित्रपटांबाबत बोलताना मिरासदार म्हणाले की, चित्रपटाची पटकथा, संवादलेखनात लेखकाला फारसे स्वातंत्र्य नसते. दिग्दर्शक -निर्माते सांगतील तेच करावे लागते. त्यामुळे त्याचा हवा तसा परिणाम होत नाही. या क्षेत्रातील गमतीदार अनुभव त्यांनी या वेळी सांगितले.

सावरकरांच्या आवाजाची नक्कल...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा मिरासदार यांच्यावर प्रभाव आहे. सावरकरांनी मुंबईच्या पहिल्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण केले होते. त्या वेळी मिरासदार लहान होते. पण त्यांच्या एकूण व्यक्तिरेखेवरून ते कसे बोलले असतील याची नक्कल त्यांनी सादर केली.